गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 फेब्रुवारी 2023 (08:03 IST)

विधिमंडळात ६ हजार ३८३ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

devendra fadnavis
उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सन २०२२-२३ या वर्षाच्या पुरवणी मागण्या मांडल्या. या मागण्यांवर येत्या २ आणि ३ मार्च रोजी चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील. राज्याचा सन २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प ९ मार्चला सादर होणार असल्याने आर्थिक वर्षाच्या अखेरीस पुरवणी मागणीतील तरतुदी नियंत्रणात ठेवण्यात आल्या आहेत. एकूण पुरवणी मागण्यांपैकी ४ हजार ६७३ कोटीच्या मागण्या या अनिवार्य खर्चाच्या तर १ हजार ७१० कोटींच्या मागण्या या कार्यक्रमांतर्गत खर्चाच्या आहेत.
 
ग्रामपंचायत पथदिव्यांच्या विद्युत देयकांच्या थकबाकीपोटी महावितरण कंपनीला अदा करण्यासाठी २ हजार २१४ कोटी, सामूहिक प्रोत्साहन योजनेच्या अंतर्गत लघु, मध्यम, मोठ्या उद्योग घटकांना तसेच विशाल प्रकल्पांना विविध प्रोत्साहनांसाठी ७६३ कोटी, अनुदानित अशासकीय व्यवसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थांच्या शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवरील व्याजासाठी ५९८ कोटी, राज्यातील रस्ते आणि पुलांचे परिरक्षण तसेच दुरुस्तीसाठी ४५२ कोटी, जालना- नांदेड द्रुतगती मार्ग प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी अतिरिक्त ३३१ कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागणीत करण्यात आली आहे.
 
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या मार्च २०२३ या महिन्याच्या वेतनासाठी अतिरिक्त तरतूद म्हणून २६७ कोटी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी २२० कोटी , रेल्वे सुरक्षा बांधकामासाठी १९० कोटी तर राज्यातील सर्व शासकीय निवासी इमारतींच्या देखभाल दुरुस्तीसाठी ९७ कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागणीत आहे.
 
विभागनिहाय तरतूद
 
ग्रामविकास – २ हजार २१४ कोटी रुपये
सहकार, पणन, वस्त्रोद्योग – १ हजार ३३४ कोटी रुपये
सार्वजनिक बांधकाम – १ हजार ७१ कोटी रुपये
उद्योग, ऊर्जा आणि कामगार – ७६८ कोटी रुपये
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता – ५९८ कोटी रुपये
गृह – २६९ कोटी रुपये
वित्त – १०४ कोटी रुपये
 
सन २०२२-२३ मधील पुरवणी मागण्या
ऑगस्ट – २५ हजार ८२६ कोटी रुपये
डिसेंबर – ५२ हजार ३२७ कोटी रुपये
 
Edited By - Ratnadeep Ranshoor