शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (13:58 IST)

कांदा फोडून कांदा-मिरची-पोळी खाऊन अनोखे आंदोलन

A unique movement by breaking an onion
नाशिक :  कांदा दरात सातत्याने घसरण होत असल्यामुळे शेतक-यांमध्ये संताप आहे. या प्रश्नी  सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नाशिक जिल्ह्यात आंदोलनाचा सपाटा सुरु आहे. सोमवारी लासलगाव पाठोपाठ नांदगाव येथे लिलाव बंद पाडून आंदोलन करण्यात आले. सोबतच सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी सकाळी रयत क्रांती संघटनेने अनोखे आंदोलन केले. या संघटनेच्या सहा पदाधिका-यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. अगोदर त्यांनी निवेदन देऊन त्यांच्या समोरच खाली बसत कांदा फोडून कांदा-मिरची-पोळी खाऊन आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर जोपर्यंत भावाबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला. सदरचे आंदोलन सुरु झाल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांची चांगलीच चर्चा रंगली. त्यानंतर रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिपक पगार यांना पालकमंत्री दादा भुसे यांनी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. भुसे यांनी पदाधिकाऱ्याना मुख्यमंत्र्यांसोबत भेट घालून दिली जाईल आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन भुसे यांनी दिले.
 
दुसरीकडे  महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेने लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडले. लासलगाव बाजार समितीत कांद्याचे बाजार भाव २ ते ४ रुपयांपर्यंत कोसळले.  दरम्यान महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेने विक्री झालेल्या कांद्याला प्रति किलो दहा रुपये अनुदानाची मागणी केली आहे. विक्री होणाऱ्या कांद्याला ३० रुपये किलो हमीभावाची मागणी करण्यात आली आहे. तर केंद्र व राज्य सरकार ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत लिलाव चालू होऊ देणार नाही अशी भूमिका शेतकरी संघटनेने स्पष्ट केली आहे.
 
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होत आहेत.  पिकांच्या भावात घसरण होत चालली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तर कांद्याच्या भावाने रडवले आहे. कांद्याचे दर वाढल्यानंतर केंद्र सरकारकडून तात्काळ महाराष्ट्रात केंद्रीय पथक पाठवली जातात आणि कांद्याची निर्यात बंद करून कांदा परदेशी आयात केला जातो. मात्र आता कांद्याच्या भावात घसरण्यात झाल्यानंतर केंद्र सरकार गप्प असल्याने कांदा उत्पादक शेतकरी वर्ग तीव्र संताप व्यक्त करत आहेत. 
Edited by : Ratnadeep Ranshoor