शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. महाशिवरात्री
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2023 (17:12 IST)

जगातील एकमेव असे मंदिर, इथे भगवान शंकराच्या पुढे नाही नंदी

- रत्नदीप रणशूर 

महादेवाच्या पंचमुखी चांदीच्या मुखवट्याची अनोखी परंपरा

‘मंदिराचं गाव’ अशीही नाशिक शहराची ओळख आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले त्र्यंबकेश्वराचे मंदीर, सीतागुंफा, पंचवटी ही धार्मिक तीर्थाटनाची ठिकाणी आहे. या सगळ्यामध्ये शिवभक्तांना कायमच ‘कपालेश्वराची’ ओढ, कुतूहल आणि श्रद्धा राहीलेली दिसते. याठिकाणी भगवान शंकराच्या पुढे नंदी नाही असे एकमेव मंदिर अशी या मंदिराची आख्यायिका अशी आहे. बारा ज्योतिर्लिंगांचे पुण्य कपालेश्वराच्या दर्शनातून मिळते असे भक्तगण मानतात. त्यामुळे शिवपुराणात कपालेश्वराचे स्व:ताचे असे वेगळे महत्व आहे. त्याचप्रमाणे जागृत आणि मनोकामना पूर्ण करणारे शिवमंदीर म्हणूनही ते ओळखले जाते.
 
या मंदिराविषयीची कथा अशी आहे की, एकदा इंद्रसभा भरली होती. त्यावेळी सर्व देव सभेस उपस्थित होते. त्यावेळी ब्रह्मदेव व महेश (शंकर) यात वादविवाद झाला. त्यावेळी पाच तोंडे असणार्या ब्रह्मदेवाची चार तोंडे वेद म्हणत तर पाचवे तोंड निंदा करीत असे. संतापलेल्या शंकराने ब्रह्मदेवाचे ते निंदणारे तोंड उडवले. ते तोंड शंकराच्या हाताला चिकटून बसले. त्यामुळे शंकराला ब्रह्महत्येचे पातक लागले. त्या पापापासून मुक्तता मिळवण्यासाठी शंकर ब्रह्मांडभर फिरत होते.
एकदा सोमेश्वर येथे बसले असता, समोरच एक गाय व तिचा गोर्हा (नंदी) एका ब्राह्मणाच्या दारात उभा होता. त्यांच्या संवादात गोर्हा म्हणाला की, मी नाकात वेसण घालणार नाही, उद्या तो ब्राम्हण मला वेसण घालायला आल्यावर मी त्याला मारणार'. त्यावर त्याच्या आईने (गायीने) त्यास म्हटले, 'तू हे जर केलेस तर तुला एका ब्राह्मणाला मारल्याचे म्हणजेच ब्रह्महत्येचे पातक लागेल'. त्यावर तो नंदी म्हणाला, 'मला त्यावरचा उपाय माहीत आहे.' दुसर्या दिवशी ब्राह्मण गोर्ह्यास वेसण घालायला आला असताना, नंदीने त्याला शिंगाने हुसकले. त्यात त्या ब्राह्मणाला मृत्यू आला आणि नंदीचे शरीर काळे ठिक्कर पडले. आता पुढे काय होतेय हे उत्सुकतेने पाहत शंकर त्या नंदीच्या मागे जाऊ लागला.
त्यानंतर त्या नदीने गोदावरीच्या पात्रातील (रामकुंडात) त्रिवेणी संगमावर येऊन स्नान केले. त्याबरोबर त्याचा मूळ शुभ्र रंग त्याला परत मिळाला. ते पाहून शंकरानेही त्या त्रिवेणी संगमात स्नान केले. त्याबरोबर मागे लागलेल्या मस्तकापासून भगवान शंकराची सुटका झाली. त्याच गोदावरी काठावर एक मोठी टेकडी होती. त्या टेकडीच्या कपारात शंकर जाऊन बसले असता नंदीही तेथे आला. त्यावर 'तुझ्यामुळे माझी ब्रह्महत्येतून सुटका झाली, त्यामुळे यापुढे तू माझ्यासमोर बसू नकोस तू माझ्या गुरुसमान आहेस' असे शंकराने नंदीस सांगितले. त्यामुळे इथे शंकराच्या या मंदिरात नंदी नाही. जगातील हे असे एकमेव मंदिर आहे.
महादेवाच्या पंचमुखी मुखवट्याची अनोखी परंपरा
या मंदिरात कपालेश्वराच्या पंचमुखी मुखवट्याची अनोखी परंपरा पाहिला मिळते. सदरचा मुखवटा हा पूर्णपणे चांदीचा असून त्याने डोक्यावर देवी गंगा आणि चंद्रदेव यांना धारण केले आहे. सोबत त्रिशूळ आणि नागा सुद्धा आहेत. ऐतिहासिक दस्तानुसार श्री कपालेश्वराची श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी तत्कालीन ग्रामस्थ मंडळी वर्गणी करून पालखी काढीत असतं. या पालखी परंपरेत खंड पडू नये म्हणून कै. दादाजी उमाशंकर वैद्य यांनी ६ नोव्हेंबर १८९३ रोजी धनोत्रयोदशीला दि कपालेश्वर पालखी प्रोसेशन ट्रस्टची स्थापना केली. तेव्हापासून वैद्य कुटुंबीयांकडे ट्रस्टचा कारभार आहे.  सुमारे १२५ वर्षापासून वैद्य कुटुंबीयांनी अखंडपणे चालवत आहे.

यामध्ये सदरचा पंचमुखी महादेवाचा मुखवटा वर्षभरातील सर्व सोमवती अमावस्या, श्रावणी सोमवार आणि  महाशिवरात्र या दिवशी कपालेश्वराच्या मंदिरात आणला जातो. पालखीच्या दिवशी साधारणपणे दुपारी २ च्या सुमारास मुकूट विधीवत मंदिरात नेला जातो. त्यानंतर पूजाअर्चा झाल्यानंतर दुपारी ४ च्या सुमारास कपालेश्वर मंदिरातून वाजत गाजत पंचमुखीची पालखी काढली हाते. पुढे संध्याकाळी रामकुंडावर दुध, दही, मध, उसाचा रस याचा अभिषेक करण्यात येतो. सुमारे पाच ते सहा तासांचा महापूजा बांधली जाते.  त्यानंतर आरती झाल्यानंतर पंचमुखी पुन्हा एकदा मंदिरात नेली जाते.  तिथे पुन्हा एकदा रात्री बारा वाजता पुन्हा एकदा पूजा केली जाते. इतर दिवशी कपालेश्वराचा हा मुखवटा वैद्य कुटुंबीयांच्या देव्हाऱ्यात असतो.