गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 20 मे 2021 (22:10 IST)

लग्न समारंभात ११९ बाधित झाल्यानंतर संपूर्ण भोसी गावाने असा मिळवला कोरोनावर विजय

महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील सहा हजार लोकसंख्या असलेल्या भोसी गावाने कोरोनामुक्तीसाठी यशस्वी प्रयत्न केला आहे. एका लग्न समारंभानंतर भोसी गावात कोरोना रुग्णांची वाढती  संख्या लक्षात घेऊन जिल्हा  परिषद सदस्य प्रकाश देशमुख भोसीकर यांनी पुढाकार घेऊन , ग्राम पंचायत आणि आरोग्य विभागाच्या समन्वयाने गावात आरोग्य शिबीर आयोजित करून त्यात गावकऱ्यांच्या रॅपिड अॅनटीजेन आणि आरटीपीसीआर कोरोना चाचण्या केल्या. त्यात तब्बल ११९ गावकरी कोविड पोझीटीव्ह निघाले.
 
या चाचण्यांमध्ये बाधित आढळलेल्या सर्व गावकऱ्यांचा गावातील अन्य व्यक्तींशी संपर्क टाळला.  यासाठी शेतात विलगीकरण  करण्यात आले . शेतमजूर आणि स्वतःची शेती नसलेल्या अन्य बाधितांची सोय जिल्हा  परिषद सदस्य प्रकाश देशमुख भोसीकर यांनी आपल्या शेतात एक 40 बाय 60 आकाराची शेड उभारून त्यात केली.
 
गावातील  आशा कार्यकर्ती आणि अंगणवाडी सेविका या दररोज या रुग्णांना भेट देऊन त्यांची विचारपूस करत असत. या रुग्णांना जेवण, आवश्यक ती औषधे आणि अन्य गरजेच्या वस्तू ग्रामसेवक आणि आरोग्य विभाग यांनी उपलब्ध करून दिल्या. 
 
या गावकर्यांनी 15 ते 20 दिवस विलगीकरणात काढल्यानंतर त्यांची भोकर या तालुक्याच्या गावी आरोग्य तपासणी झाल्यानंतरच  ते कोरोनामुक्त व्यक्ती म्हणून गावात परतले . लक्ष्मीबाई अक्केमवाड आणि विशाल कल्याणकर या दोघा रुग्णांनी आपला विलगीकरणाचा अनुभव सांगत शेतात राहून  संसर्गाची साखळी तोडल्यानेच गावातले इतर नागरिक बाधित होण्यापासून वाचले असे सांगितले. विशेष म्हणजे गावातील  कुठल्याही रुग्णाला कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले नाही.