शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 मे 2021 (07:55 IST)

ग्लोबल टेंडर’ नुसतं स्टंटबाजी म्हणून काढायचे का? पिंपरी महापालिका आयुक्त

कोविड-19 प्रतिबंधक लसीबाबत जागतिक निविदा (टेंडर) काढूनही लस मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे नुसतं स्टंटबाजी म्हणून निविदा काढायची का? असा प्रश्न पडला आहे. तरीही पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून एकत्रित निविदा राबविण्याची चर्चा सुरु आहे. त्याला किती प्रतिसाद मिळेल माहित नाही, अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
 
पिंपरी चिंचवड शहर कोरोनामुक्तीचे उद्दिष्ट साध्य करणे तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचण्याकरिता प्रत्येक नागरिकाला पिंपरी महापालिका लस देणार आहे. त्यासाठी जागतिक निविदा काढण्यात यावी, असे पत्र महापौर माई ढोरे यांनी आयुक्त पाटील यांना दिले. तसेच जागतिक निविदेबाबत लवकर कार्यवाही करण्याची सूचना स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड नितीन लांडगे यांनीही स्थायीच्या बैठकीत केली होती.
 
दरम्यान, ग्लोबल टेंडर काढण्यामागील कारणमिमांसा करताना आयुक्त म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहराला कोरोना लसीचा सरकारकडून पुरवठा होणार आहे. सध्यस्थितीत सर्वत्र लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण मोहीम संथगतीने सुरु आहे. त्यामुळे सर्व नागरिकांच्या लसीकरणास वेळ लागणार आहे. सरकारने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद केले आहे. शहरात याच वयोगटातील लोकसंख्येचा विचार करुन पुरेशा लसीची तातडीची गरज आहे. त्यानूसार पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे एकत्रित निविदा राबविण्याचे चाचपणी सुरु आहे. परंतू, टेंडर काढूनही त्यावर कंपन्या किती प्रतिसाद देतील, याबाबत साशकंता आहे. असेही पाटील म्हणाले.