गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 19 मे 2021 (21:16 IST)

अन्यथा काँग्रेस पक्ष राज्यभर घंटानाद आंदोलन करेल, पटोले यांचा इशारा

शेतकऱ्यांचे मरण हेच मोदी सरकारचे धोरण' असून शेतकरी विरोधी तीन काळे कायदे आणल्यानंतर आता रासायनिक खतांच्या किंमती वाढवून शेतकऱ्यांना उद्धवस्त करण्याच्या मोहिमेला मोदींनी वेग दिला आहे. दीडपटीने वाढलेल्या खतांच्या किंमतीमुळे शेतकऱ्यांना शेती करणे परवडणार नाही व मोठ्या उद्योगपतींना शेती कंत्राटीपद्धतीने देण्याशिवाय त्याच्यापुढे पर्याय राहू नये म्हणूनच ही दरवाढ केली आहे," असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. तसंच दोन दिवसात ही अन्यायकारक खत दरवाढ मागे घ्यावी अन्यथा काँग्रेस पक्ष राज्यभर घंटानाद आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 
 
"कोरोनाच्या संकटात शेतकऱ्याला आधार देण्याऐवजी खतांच्या किंमती भरमसाठ वाढवून त्यांच्यावर आणखी अन्याय केला आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत केलेली दीडपट वाढ हे त्या दृष्टीनेच टाकलेले पाऊल आहे. दीडपट हमीभाव देण्याची घोषणा करणाऱ्या मोदींनी हमीभावाऐवजी शेतकऱ्यांना येणारा उत्पादन खर्च दीडपट वाढवला आहे. पेट्रोल-डिझेल, खाद्यतेलांच्या दरवाढीमुळे अगोदरच जनतेचे कंबरडे मोडले असताना रासायनिक खतांच्या दरवाढीचा बोजा शेतकऱ्यांवर टाकला आहे," असंही पटोले म्हणाले.