मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 ऑगस्ट 2024 (15:40 IST)

हायकोर्टाने सुनावल्यानंतर सिमेंट रस्त्यांचा मुद्दा ऐरणीवर; या रस्त्यांमुळे पर्यावरण, आरोग्याचे काय होते नुकसान?

नहीं चाहिए नहीं चाहिए सिमेंट रोड नहीं चाहिए’, 'नो मोअर सिमेंट रोड', असे एक ना अनेक नारे देत नागपूरच्या सामान्य जनतेनं सिमेंट रस्त्यांविरोधात आवाज उठवला.त्यांनी सिमेंट रस्त्यांविरोधात मोर्चा काढून आता आम्हाला आणखी सिमेंटचे रस्ते नको अशी मागणी केली. दुसरीकडे मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं देखील सिमेंटच्या रस्त्यावरून खडेबोल सुनावले.
"नागपुरात बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांची रचना अयोग्य आहे. यामुळे शहरात केवळ पाणी तुंबते असे नाही, तर या रस्त्यांवरून प्रवास करणं वाहन चालकांसाठीही त्रासदायक ठरते," अशा शब्दात हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली.
तसेच रस्ते आणि रस्त्यांच्या अवस्थेचा अभ्यास करण्यासाठी कोर्टानं एक समिती नेमण्याचे आदेशही महानगर पालिकेला दिले आहेत.
रस्त्यांच्या दुरावस्थेला जबाबदार असणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याबाबतच्या एका याचिकेवर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने सिमेंट रस्त्यांमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल नागपूर महानगर पालिकेवर ताशेरे ओढले आहेत.
 
सिमेंटच्या रस्त्यांमुळे पर्यावरणाचेही नुकसान होते असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. तर हा दावा फेटाळताना केंद्र सरकारची संशोधन संस्था नॅशनल इन्वॉयरन्मेंट इंजिनिअरिंग रिसर्च इंस्टिट्यूट ( NEERI ) च्या संचालकांनी म्हटले आहे की 'जर योग्य नियोजन केले तर सिमेंटच्या रस्त्यांमुळे पर्यावरणावर फारसा परिणाम होत नाही.'
सिमेंट रस्त्यांबाबत निरीक्षण मांडताना हायकोर्टाने म्हटले आहे का, "नागपुरातील रस्त्यांमुळे विशेषतः सिमेंट रस्त्यांमुळे शहरात केवळ पाणीच तुंबते असे नाही तर त्यामुळे रस्त्यावर प्रवास करणे देखील कठीण होते. सरकारी अधिकाऱ्यांनी रस्ते बांधताना देखरेखीवेळी केलेले दुर्लक्ष हे देखील कदाचित नागपुरातील रस्ते अपघाताचे कारण असू शकते."
कोर्टानं जो पाणी तुंबण्याबाबतचा उल्लेख केला त्याचा अनुभव नागपूरकर गेल्या काही वर्षांपासून घेत आहेत.
 
20 जुलैला झालेल्या मुसळधार पावसामुळे नव्याने सिमेंट रस्ते तयार झालेल्या भागात पाणी तुंबले होते. यावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
 
नागपूर महापालिकेच्या मुख्य इमारतीजवळ नव्यानं सिमेंट रस्ता तयार करण्यात आला. त्याठिकाणी पाणी तुंबलं होतं.
 
फक्त हाच रस्ता नाहीतर शहरातल्या अनेक भागांमध्ये सिमेंट रस्त्यांमुळे पाणी तुंबल्याची ओरड आहे. गेल्या काही वर्षांपासून पावसाचं पाणी तुंबून घरात शिरत असल्यानं नागरिकांनी सिमेंट रस्त्यांना विरोध केला.
'आता आम्हाला आणखी सिमेंट रस्ते नकोत,' असं नागपुरातल्या या सामान्य नागरिकांचं म्हणणं आहे.
महापालिका आयुक्त अभिजीत चौधरी यांनी सुद्धा सिमेंट रस्त्यांमुळे लोकांच्या घरात पावसाचं पाणी शिरल्याचं मान्य केलं होतं.
फक्त नागपुरातच नाहीतर पुण्यासारख्या शहरातही पाणी तुंबण्यासाठी सिमेंट रस्त्यांना दोष दिला जातो.
पण, खरंच सिमेंट रस्त्यांमुळे पाणी तुंबतं का? सिमेंट रस्ते हे शहरांसाठी धोकादायक ठरत आहेत का? त्याची कारणं काय आहेत? सिमेंट रस्त्यांचे काही फायदे आहेत का? यावर तज्ज्ञ काय म्हणतात ते पाहू.
नागपुरात चौथ्या टप्प्यातील सिमेंट रस्त्यांचं बांधकाम सुरू आहे. आधी मुख्य रस्ते हे सिमेंट काँक्रिटचे होते. आता गल्लीबोळातही सिमेंटचे रस्ते दिसत आहे.
 
सध्या चौथ्या टप्प्यात 300 कोटी रुपयांच्या 23.45 किलोमीटरचे रस्त्यांचं बांधकाम सुरू आहे, अशी माहिती महानगर पालिकेच्या बांधकाम विभागाने दिली आहे.
 
याआधी पहिल्या तीन टप्प्यांत ज्या भागात सिमेंट रस्ते तिथं पाणी तुंबत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
 
सिमेंट रस्त्यांच्या विरोधात मोर्चा काढणारे आशुतोष दाभोळकर बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, "सिमेंट रस्त्यांमुळे पावसाचं पाणी तुंबून आमच्या घरात शिरतं. जेव्हापासून सिमेंट रस्ते झाले तेव्हापासून घरात पावसाचं पाणी शिरण्याचं प्रमाण वाढलं. नागपुरातल्या गल्लीबोळात सिमेंट रस्त्यांची काम सुरू आहेत. यामुळे अपघाताचं प्रमाणही वाढलं आहे. आम्हाला नागपूर आणखी पाण्याखाली जाऊ द्यायचं नाही. आमचं ग्रीन नागपूर पूर्णपणे सिमेंट काँक्रिटचं जंगल होऊ नये म्हणून आम्ही या रस्त्यांना विरोध करत आहोत."
 
हायकोर्टाचे आणि नागरिकांचं म्हणणं आहे की सिमेंट रस्त्यांमुळे शहरात पाणी तुंबतंय.
 
खरंच शहरात पाणी तुंबण्याला सिमेंट रस्ते कारणीभूत आहेत का?
ज्या भागात पावसाचं पाणी तुंबलं त्याचे रिपोर्ट बीबीसी मराठीनं प्रकाशित केले होते. नालंदा नगरमधल्या आशीर्वाद मसराम यांच्या घरात 20 जुलैला घरात गुडघ्याइतकं पाणी तुंबलं होतं.
 
बीबीसी मराठीसोबत बोलताना ते म्हणाले होते की "आम्ही 40 वर्षांपासून इथं राहतो. पण, अजून असा त्रास झाला नाही. गेल्या चार वर्षांपासून सिमेंट रस्ता झाला तेव्हापासून आमच्या घरात पाणी शिरतं."
 
फक्त मसरामच नाहीतर नागपुरातल्या अनेक नागरिकांनी असे आरोप केलेत. त्यानंतर स्वतः महापालिका आयुक्त यांनी काही भागात पाणी तुंबण्याला सिमेंट रस्तेही जबाबदार असल्याचं म्हटलं.
 
ते बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले होते, "सिमेंट रस्ते झाले त्या भागात पाणी तुंबलेलं होतं. सिमेंट रस्त्यांची उंची जास्त झाली आणि घर सखल भागात झाले. त्यामुळे लोकांच्या घरात पाणी शिरलं."
सिमेंट रस्ते बांधताना नक्की काय चुकतं ज्यामुळे शहरात पूर येतो?
आता हायकोर्टानंही त्यांच्या ऑर्डरमध्ये सिमेंट रस्त्यांची स्तरबद्धता अयोग्य असल्याचं म्हटलंय. मग, सिमेंट रस्ते बांधताना कोणत्या नियमांचं पालन करायला हवं?
 
याबद्दल विश्वेश्वरैया नॅशनल इंस्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (VNIT) चे सिव्हिल इंजिनिअर विभागाचे प्राध्यापक व्ही. एस. लांडगे यांनी सविस्तर अभ्यास केलाय.
 
सिमेंट रस्त्यांचं बांधकाम कसं असायला हवं जेणेकरून शहरात पाणी तुंबणार नाही याबद्दल त्यांनी सविस्तर प्रक्रिया समजावून सांगितली.
 
बीबीसी मराठीसोबत बोलताना लांडगे म्हणाले, "कुठलाही रस्ता फक्त पृष्ठभाग बनवून होत नसतो. मीडियन, पृष्ठभाग, रस्त्याच्या बाजूला असणारी जागा, पाणी वाहून जाण्यासाठी गटारं आणि पायी चालण्यासाठी जागा या सगळ्या गोष्टी मिळून रस्ता तयार होतो. पण, आपल्याकडे सिमेंट रस्ते बनवताना इतर कुठल्याही गोष्टींचा विचार न करता फक्त काँक्रिटचा पृष्ठभाग बनवला जातो.
 
"रस्ता बनवताना पाणी वाहून नेण्यासाठी व्यवस्थित ड्रेनेज काढायला हवे. तसेच खराब झालेला रस्ता असेल तर तो पूर्ण खोदून जुना त्यातील ढिगारा बाहेर काढून जवळपास दोन ते अडीच फूट खोदून पुन्हा रेती, माती, गिट्टी टाकून दाब द्यायला हवा. त्यानंतर काँक्रिटचा पृष्ठभाग बनवायला हवा. यामुळे रस्ता घरांपेक्षा उंच होणार नाही. पण, आपल्याकडे निधीअभावी जुन्या रस्त्यांवरच सिमेंट पसरवून रस्ते बनवले जातात. त्यामुळे लोकांच्या घरात पाणी शिरतं," लांडगे सांगतात.
"सिमेंट रस्ते टिकाऊ असतात. ते नियोजनबद्ध पद्धतीनं बांधले की पुढची 50 वर्षं त्याला काहीच होत नाही," असंही ते सांगतात.
 
पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर सिमेंटच्या रस्त्यांसोबतच नाल्यांच्या बांधकामावर प्रश्न उपस्थित करतात.
 
ते बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, "सिमेंट रस्त्यांचा फक्त टिकाऊपणा ग्राह्य धरून चालणार नाही. सिमेंट रस्त्यांच्या बाजूला बांधलेल्या नाल्या आधी दगडाच्या असायच्या. त्यामुळे पाणी नीट वाहून जात होतं. पण, आता या नाल्यासुद्धा सिमेंटच्या झाल्या. त्यामुळे पाण्याचा हायड्रोलिक फ्लो होत नाही. जमिनीत पाणी न मुरल्यामुळे शहरात पूर येतो."
सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांमुळे उष्णता वाढतेय?
ही झाली पावसाळ्यातली परिस्थिती. पावसाळ्यात सिमेंट रस्ते नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असल्याचं दिसतंय. पण, उन्हाळ्यातही या सिमेंट रस्त्यांचा शहरांवर, तिथे राहणाऱ्या नागरिकांवर काही परिणाम होतो का ? हे देखील जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.
 
पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर याचा संबंध थेट पर्यावरणासोबत जोडतात.
 
देऊळगावकर सांगतात, "आधी शहरांत देखील माती, झाडं होतं. पण, या गोष्टी हळूहळू नष्ट होत चालल्या. सिमेंट रस्ते असो की शहरात झालेलं काँक्रिटीकरण यामुळे शहरांमधली उष्णता वाढत चाललीय. काँक्रिटच्या बांधकामांमध्ये उष्णता शोषून ठेवण्याची क्षमता असते. परिणामी शहरं उष्णतेची बेटं होत चाललेय."
पण, अर्बन हिट आयलँड इफेक्टसाठी फक्त सिमेंट रस्त्यांना दोष देऊन चालणार नाही, असं राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI) चे संचालक अतुल वैद्य यांना वाटतं.
 
बीबीसी मराठीसोबत बोलताना वैद्य म्हणाले, "सिमेंट रस्ते लवकर थंड होत नाहीत. त्याचा वातावरणावर परिणाम होतो. पण यासोबतच एसी गाड्या, घरातले रेफ्रिजरेटर, एसी यामुळेही उष्णता वाढत चाललीय."
 
सिमेंट हवामान बदलाचा प्रमुख घटक?
पर्यावरणाच्या दृष्टीनं फक्त अर्बन हिट आयलँड इफेक्टच नाहीतर सिमेंटमधून होणारं कार्बन उत्सर्जन हा सुद्धा पर्यावरणावर होणारा मोठा परिणाम आहे.
 
मानवनिर्मित सामग्री असणाऱ्या काँक्रिटचा जगात वापर वाढत चाललाय. पृथ्वीवर सर्वांत जास्त वापरल्या जाणाऱ्या संसाधनामध्ये पाण्यानंतर काँक्रिटचा क्रमांक लागतो, असं म्हणतात. पण, याच काँक्रिटमध्ये सिमेंट हा महत्वाचा घटक आहे.
 
सिमेंट तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक प्रक्रियांमुळे मोठ्या प्रमाणात कार्बनचं उत्सर्जन होतं.
 
चॅटम हाऊसच्या (chathamhouse) च्या 2020 च्या एका रिपोर्टनुसार, दरवर्षी 4 अब्ज टनांहून अधिक सिमेंटचं उत्पादन केलं जातं.
सिमेंटमधून होणारं कार्बन उत्सर्जन हे जागतिक कार्बन उत्सर्जनाच्या 8 टक्के आहे. त्यामुळे सिमेंटचं उत्पादन आणि त्याचा वापर हा जागतिक हवामान बदलाचा प्रमुख घटक समजला जातो.
केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या वेबसाईटनुसार, आपला देश सिमेंट उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
 
आता शहरात आणि खेडोपाडीही होत असलेलं काँक्रिटीकरण आणि रस्त्यांचं जाळं यामुळे सिमेंटची मागणी आणखी वाढत आहे. पण, याच सिमेंटचं उत्पादन होताना त्यामधून उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडचं काय? त्याचा वातावरणावर होणाऱ्या परिणामांबद्दल काय? हा प्रश्न आहे.
 
सिमेंट तयार होताना त्यामधून कार्बन एमिशन होतं हे सत्य आहे. पण, टार रोडसाठी वापरण्यात येणारं बिट्युमेन तयार करताना सुद्धा कार्बन एमिशन होतं.
 
"सिमेंट रस्ते योग्य नियोजन करून बांधले तर पर्यावरणावर त्याचा फारसा परिणाम होत नाही," असं निरीचे संचालक अतुल वैद्य सांगतात.
 
सिमेंटचा आरोग्यावरही वाईट परिणाम?
सोबतच सिमेंट रस्त्यांमुळे आरोग्यावरही वाईट परिणाम होत असल्याचं एका निरीक्षणात्मक अभ्यासातून समोर आलंय. नागपुरात क्रिम्स (KRIMS) हॉस्पिटलमध्ये तीन वर्षांत अचानक श्वसनासंबंधी आजाराचे रुग्ण वाढले होते.
रुग्ण का वाढले याचा निरीक्षणात्मक अभ्यास या हॉस्पिटलचे पल्मोनोलॉजिस्ट डॉ. अशोक अरबट यांनी केला आहे.
बीबीसी मराठीसोबत बोलताना डॉ. अरबट म्हणाले, 'श्वसनासंबंधी आजाराचा रुग्ण जेव्हा येतो तेव्हा त्या भागातलं वातावरण कसं आहे? याची माहिती घेतली जाते.'
कुठल्या प्रदूषणामुळे त्या रुग्णाला त्रास होतोय का? हे तपासलं जातं. नागपुरातल्या क्रिम्स हॉस्पिटलने गेल्या तीन वर्षांत अशाच रुग्णांचा निरीक्षणात्मक अभ्यास केला.
श्वसनासंबंधी आजाराची तक्रार घेऊन रुग्ण आले की त्यांच्या भागात कोणतं बांधकाम सुरू आहे? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी होकारार्थी उत्तर दिल्याचं डॉ. अरबट सांगतात.
 
"ज्या भागांत सिमेंट रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणात झाली होती त्या भागातून श्वसनासंबंधी आजार असलेल्या रुग्णांची संख्या वाढली होती. अशा भागातून जवळपास 200 रुग्णांनी आमच्याकडे उपचार घेतले," असं डॉ. अरबट सांगतात.
 
पण, सिमेंट रस्त्यांमुळे श्वसनाचे आजार कसे होतात? याबद्दल डॉ. अरबट बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, "सिमेंट हा एक धूर असतो. ज्या भागात बांधकाम सुरू असेल तर हा धूर हवेत मिसळतो आणि हवेची गुणवत्ता खराब होते आणि असे दूषित कण, दूषित हवा श्वसन मार्गानं आत गेली की त्याचा फुफ्फुसावर परिणाम होतो. त्यामुळे दम्यासारखे श्वसनाचे आजार होतात."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
Published By- Priya Dixit