मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (08:21 IST)

अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग,आरोग्य विभागाकडून कठोर कारवाई, चार जणांना अटक

अहमदनगरमधील जिल्हा रूग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या प्रकरणी आरोग्य विभागाने कठोर कारवाई केली असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. अटक झालेल्यांमध्ये एक वैद्यकीय अधिकारी आणि 3 परिचारिकांचा समावेश आहे. वैद्यकिय अधिकारी विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना अंनत अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. विशाखा शिंदे आणि सपना पठारे यांचं निलंबन केलं होतं, तर अस्मा शेख आणि चन्ना अनंत यांची सेवा समाप्त केली होती.
 
अहमदनगरमधल्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील आयसीयूत शनिवारी सकाळी आग लागली होती. ज्यावेळी ही आग लागली त्यावेळी एकूण 17 रुग्ण उपचार घेत होते.  धुरामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत जाता आलं नाही.  अग्निशमन दलाच्या जवानांनी खिडक्यांच्या काचा फोडून आग विझवण्याचा प्रयत्न केला.

एका अधिकाऱ्याने दावा केला की बहुतेक रुग्ण ज्येष्ठ नागरिक होते आणि त्यापैकी बहुतेक व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजनवर होते. त्यामुळे बचावकार्य अधिक गुंतागुंतीचं झाले. सकाळी 11 वाजता आग लागल्यावर प्रथम घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 11 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी 15 रुग्ण व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजनवर होते.
 
आगीच्या घटनेच्या चौकशीसाठी सहा सदस्यांची चौकशी समिती नेमण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार यांनी दिली. डॉ. भारती पवार यांनी शनिवारी दुपारी रुग्णालयाला भेट दिली होती. आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांबद्दल त्यांना दु:ख व्यक्त केलं.
 
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत देणार असल्याची माहिती दिली, तर एका आठवड्याच्या आत या प्रकरणाची चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिल्याची माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.