शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (08:01 IST)

राज्यात दहा कोटी लसीकरण सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

राज्यातील कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाने आज दहा कोटींचा टप्पा पार केला. आज दुपारी चार वाजता राज्यात दहा कोटी लसींच्या मात्रा देण्याचा टप्पा गाठण्यात आरोग्य विभागाला यश आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
 
टोपे यांनी सांगितले की, राज्यात लसीची पहिली मात्रा ६,८०,५३,०७७ तर दुसरी मात्रा ३,२०,७४,५०४ देण्यात आल्या आहेत. एकूण १०,०१,२७,५८१ लस मात्रा देण्यात आल्या आहेत. या यशात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व स्तरावरील अधिकारी-कर्मचारी यांच्याबरोबरच लसीकरण मोहिमेत योगदान देणाऱ्या प्रत्येकाचा मोलाचा वाटा आहे.
टोपे यांनी सांगितले की, लसीकरणाच्या मोहिमेस गती देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्राधान्य दिले आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी, मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले. त्यामुळेच हा टप्पा पार करता आला. राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचून लसीकरण केले जाणार आहे. त्याचबरोबर राज्यातील प्रत्येक पात्र नागरिकाला ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत लशीच्या दोन्ही मात्रा देण्याचे उद्दिष्ट आहे.
 
राज्यातील लसीकरणाच्या मोहिमेस सोळा जानेवारीला सुरुवात झाली होती. प्रथम सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरणाची मोहिम राबविण्यात आली. त्यानंतर खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण करण्यात येऊ लागले. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी मिशन कवच कुंडल, मिशन युवा स्वास्थ्य अशी अभियान राबविण्यात आले.