अहमदनगर आग दुर्घटनाः सरकारची कठोर कारवाई; चौघे निलंबित तर दोघांची सेवा समाप्त
अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीप्रकरणी राज्य सरकारने आज कठोर कारवाई केली आहे. या दुर्घटनेत एकूण ११ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवाळीच्या सणात झालेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. त्याची गंभीर दखल सरकारने घेतल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. आठ दिवसात ही समिती अहवाल देणार आहे. मात्र, प्रारंभी मिळालेल्या माहितीच्या आधारे सरकारने कठोर निर्णय घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिली आहे. डॉ. टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण ४ जणांना निलंबित करण्यात आले आहे तर दोघांची सरकारी सेवा समाप्त करण्यात आली आहे. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश ढाकणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे आणि स्टाफ नर्स सपना पठारे यांचा समावेश आहे. तर, सेवा समाप्त करण्यात आलेल्यांमध्ये स्टाफ नर्स आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांचा समावेश आहे.