सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (22:12 IST)

निवडणूक आयोगाकडून भाजपच्या 12 आमदारांना दिलासा

महाराष्ट्रातील 12 निलंबित आमदारांबाबत भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. निलंबित आमदारांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करता येणार आहे.  
 
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशात गैरवर्तनाचं कारण देत भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर आता राज्यसभा निवडणुकीत या आमदारांना मतदान करण्याची परवानगी असणार आहे. 
 
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जोरदार राडा पाहायला मिळाला होता. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली होती. त्याचबरोबर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनाही धक्काबुक्की आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी आपलं मत सभागृहात मांडलं. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी बहुमतानं मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं.
 
ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं. त्यात आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीया आदी आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे.