बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 7 नोव्हेंबर 2021 (10:05 IST)

अहमदनगर आग : 'पेटलं पेटलं म्हणून लोक ओरडल्यानं आम्ही ICU वॉर्डाकडे पळत सुटलो आणि.

राहुल गायकवाड
"सकाळी साफ सफाईचं काम सुरु होतं. त्यामुळे आम्ही वॉर्डापासून लांब एका झाडाखाली बसलो होतो. इतक्यात काही लोक 'पेटलं, पेटलं' म्हणून ओरडू लागले. आम्ही आयसीयू वॉर्डाकडे पळत सुटलो.''
 
अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयातील आगीतून वाचलेल्या लक्ष्मण सावळकर यांचा मुलगा बाळासाहेब सावळकर सांगत होते. शनिवारी (6 ऑक्टोबर) सकाळी 10 च्या सुमारास अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातील कोव्हिडच्या आयसीयू वॉर्डला आग लागली.
 
ही आग शॉक सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आयसीयू वॉर्डात 17 रुग्ण उपचार घेत होते. या आगीत आतापर्यंत 11 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्ष्मण सावळकर हे सुद्धा आग लागलेल्या आयसीयु वॉर्डात उपचार घेत होते. त्यांच्या सुदैवाने त्यांना वेळेत दुसऱ्या वॉर्डमध्ये हलविण्यात आलं. त्यांच्यावर त्या वॉर्डात उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.
अॅम्ब्युलन्सची वाट पाहत थांबलेल्या बाळासाहेब सावळकर यांच्या डोळ्यात वडिलांच्या प्रकृतीची काळजी दिसत होती. सर्व सामान घेऊन ते हॉस्पिटलच्या लॉबीमध्ये उभे होते. सकाळी आग लागल्याचा प्रसंग त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना उलगडून सांगितला.
 
'असा भयानक प्रसंग पहिल्यांदाच पाहिला'
बाळासाहेब सावळकर म्हणाले, ''अहमदनगर जिल्ह्यातलं बोधेगाव आमचं गाव. आम्ही सगळे शेती करतो. वडीलसुद्धा शेतातच काम करायचे. खरंतर त्यांना कोव्हिड कसा झाला हाच आम्हाला प्रश्न आहे. ते शेताच्या पलिकडे फारसे जात नव्हते.
 
त्यांना थंडी ताप आला तेव्हा डॉक्टर सिटी स्कॅन करा म्हणाले. आम्ही त्याचं कारण विचारलं तर त्यांना कोव्हिड झाला असू शकतो, असं डॉक्टर म्हणाले. आपल्याला कोव्हिड झाला याचीच वडिलांना जास्त भीती बसली.''
 
''त्यांना 12 दिवसांपूर्वी इथं अॅडमिट केलं. सुरुवातीला त्यांना साध्या वॉर्डात ठेवलं होतं पण त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना आयसीयुमध्ये शिफ्ट केलं. आग लागली तेव्हा आम्ही हॉस्पिटलच्या परिसरात होतो. सकाळी झाडून घेण्याचं काम सुरु असल्याने आम्ही दूर झाडाखाली बसलो होतो. सगळे लोक 'पेटलं, पेटलं' म्हणाले आणि आम्ही वॉर्डाकडे पळत सुटलो. सिस्टर आणि डॉक्टरांनीच त्यांना बाहेर काढून दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट केलं.''
ज्या वॉर्डात रुग्णांना शिफ्ट करण्यात आलं त्या वॉर्डात काम करणाऱ्या एक नर्स ओळख न सांगण्याच्या अटीवर म्हणाल्या, ''माझी शिफ्ट 10 नंतर सुरु होते.
 
मी जेव्हा वॉर्डात आले तेव्हा काहीसं घबराटीच वातावरण होतं. आयसीयुमधून या वॉर्डात रुग्ण हलवले होते, त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटर लावणे त्यांची ऑक्सिजनची पातळी तपासण्याचे काम सुरु होते. कोव्हिडचे संकट सुरु झाले तेव्हापासून आम्ही काम करतोय पण असा भयानक प्रसंग पहिल्यांदाच पाहिला.''
 
बांधकामानंतर वर्षभरातच आग?
आग लागलेली इमारत ही वर्षभरापूर्वीच बांधण्यात आली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत इथे असलेला आयसीयू वॉर्ड सुरु करण्यात आला होता. इथली सर्व उपकरणं आणि यंत्रणा नवीन होती. त्यामुळे वर्षभराच्या आतच आग लागल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
 
या इमारतीचं फायर ऑडिट केलं असल्याचं अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी माध्यमांना सांगितलं.
 
आगीत मृत्युमुखी पडलेले रुग्ण हे अहमदनगर जिल्ह्यातील विविध भागातील रहिवासी आहेत. यात सहा पुरुष आणि पाच महिला रुग्णांचा समावेश आहे. पीडितांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची तातडीची मदत देणार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले.
घटनेची माहिती मिळताच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. त्याचबरोबर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदामंत्री जयंत पाटील, खासदार डॉ. सुजय विखेपाटील, आमदार रोहित पवार यांनी देखील हॉस्पिटलला भेट देत माहिती घेतली.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
 
विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी
हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर बीबीसी मराठीशी बोलताना भारती पवार म्हणाल्या, ''17 पेशंट आयसीयूमध्ये उपचार घेत होते. त्यापैकी या घटनेत 11 रुग्णांचा मृत्यु झाला. या घटनेतून बचावलेल्या 6 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली.
 
ही दुर्देवी घटना आहे. याची चौकशी सुरु आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉकसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी देखील या घटनेची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.''
 
'विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात येईल. लवकरात लवकर त्याचा अहवाल प्राप्त होईल. ज्यांच्या हलगर्जीपणामुळे या रुग्णांचा मृत्यू झाला याची चौकशी केली जाईल. हलगर्जीपणा करणाऱ्याला योग्य ते शासन करण्यात येईल,' अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
'या घटनेबाबत गुन्हा देखील आपण दाखल करणार आहोत. फायर ऑडट झाले होते का याची देखील चौकशी करण्यात येईल. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहेत. त्यावरुन कोणी दोषी असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल,' असंही मुश्रीफ यांनी म्हटलं.