औरंगाबादमध्ये 'संविधान वाचवा, देश वाचवाचा' गजर
देशातील वाढत्या मनुवादी विचारसरणीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध
राज्यभरात राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे 'संविधान वाचवा, देश वाचवा' हे अभियान सुरु करण्यात आले आहे. संविधानिक तत्त्वांची मशाल घेऊन आज औरंगाबादमध्ये देशातील वाढत्या मनुवादी विचारसरणीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. यावेळी विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी महिला काँग्रसेच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान, राष्ट्रवादी महिला काँग्रसेच्या प्रदेशाध्यक्ष चित्र वाघ, आदी उपस्थित होते.
संविधान वाचवा, देश वाचवा ही मोहीम आजच्या दिवसाला काळाची गरज होऊन बसली आहे. संविधानाबाबत सरकार दुटप्पी भूमिका घेत आहे, त्यामुळे सरकार उलथवून टाकत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा यावेळी बोलताना आ. अजित पवार यांनी दिला. तसेच सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करत पवार यांनी सरकारच्या निष्क्रियतेचे वाभाडे काढले. मराठवाड्यातील विविध प्रश्नांवर त्यांनी यावेळी भाष्य केले. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे दुष्काळ का जाहीर करत नाहीत हा सवाल आहे. मुख्यमंत्र्यांना आणखी किती आत्महत्या हव्या आहेत? असा सवाल त्यांनी केला. मराठवाड्यात भारनियमनाचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे. आघाडी सरकार असताना आदरणीय शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्य भारनियमनमुक्त करू असा निर्धार आम्ही केला होता. राज्य आम्ही भारनियमनमुक्त केले ही मात्र आताचे सरकार तसं करताना दिसत नाही, असेही ते म्हणाले.