अजित पवार यांनी पटोलेंचे 'ते' विधान फेटाळले
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 10 मार्चला मंत्रिमंडळात फेरबदल होतील, असं वक्तव्य केलं होतं. पटोले यांच्या वक्तव्याला आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. असे कोणतेही बदल होणार नाही, याचा निर्णय हे तिन्ही पक्षाचे प्रमुख ठरवतील. असं म्हणत अजित पवार यांनी पटोलेंचे विधान फेटाळले आहे. त्यावेळी ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, ”हे सरकार शरद पवार , काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आणले आहे. सरकारमध्ये काही बदल करायचे आहे की नाही, हे तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन ठरवतील. हे ठरवतील तसे आम्ही काम करत आहोत. राज्याचे प्रमुख जे ठरवतील ते होईल,” असं म्हटल आहे.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, ”तिन्ही पक्षात मतांतर होणार नाही याची काळजी घेतली जाते. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा शिकवला. मतांची विचारधारा वेगळी असू शकते पण यापूर्वी अशी कटुता कधीच नव्हती. यापूर्वीही सरकार वेगवेगळी आली. महाराष्ट्राला न शोभणारी वक्तव्य केली जात आहेत, मत स्वातंत्र्य असले तरीही ही महाराष्ट्राची परंपरा नाही.”