शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 जानेवारी 2024 (08:38 IST)

तीनही मंत्र्यांचा काळे फुगे सोडून आदिवासी कोळी समाजातर्फे निषेध

Protest
जळगाव : जातीचे दाखले नोंदींवरून सरसकट मिळावेत, जातवैधता प्रमाणपत्र मिळावे, यांसह अन्य मागण्यांची शासन-प्रशासन दखल घेत नसल्याने आदिवासी कोळी समाज बांधवांनी येथे पुन्हा सुरू केलेल्या आंदोलनाच्या 14 व्या दिवशी बुधवारी जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांच्या प्रतिमा तसेच मंत्रिमहोदयांनी आकाशावरून जमिनीवर यावे, जास्त हवेत उडू नये, असा उल्लेख असलेले काळे फुगे आकाशात सोडून निषेध केला.
 
शहरातील शिवतीर्थ मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आदिवासी कोळी आंदोलन समितीतर्फे अन्नत्याग आंदोलन चालू आहे. पुंडलिक सोनवणे, प्रभाकर कोळी हे उपोषणास बसले आहेत. बुधवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास समितीतर्फे प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वात संतप्त समाजबांधवांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन आणि मदत व पुनवर्सनमंत्री अनिल पाटील यांच्या प्रतिमा व त्यांनी आकाशावरून जमिनीवर यावे व जास्त हवेत उडू नये, असा उल्लेख असलेले काळे फुगे आकाशात सोडले. राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात बबलू सपकाळे, विशाल सपकाळे, दीपक तायडे, प्रल्हाद सोनवणे आदी सहभागी होते.
 
प्रा. सोनवणे यांनी, आदिवासी टोकरे कोळी समाजाला जातीचे दाखले व जातवैधता प्रमाणपत्र सुलभरित्या न दिल्यास याची किंमत शासनाला मोजावी लागेल, असा इशारा दिला. जिल्ह्यातील एकही मंत्री आंदोलनस्थळी आलेला नाही. मंत्र्यांनी जनतेकडे यायला हवे आणि अडचणी सोडवल्या पाहिजेत, अशी मागणी करुन प्रा. सोनवणे यांनी, आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यावरही टीका केली.