रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 जानेवारी 2022 (21:14 IST)

अमृता फडणवीसांनी कविता रचून विद्या चव्हाणांना पाठवली नोटीस

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. आपल्याबाबत अवमानकारक विधानं केल्याचा आरोप अमृता फडणवीस यांनी केला आहे.
भाजपच्या आयटी सेलचे महाराष्ट्र प्रभारी जितेन गजारिया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे यांची तुलना बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्याशी केली होती. त्याबाबत जितेन गुजारिया यांना अटकही झालीय.
 
याच अनुषंगाने विद्या चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीशी बातचीत केली. त्यावेळी त्यांनी अमृता फडणवीसांचा उल्लेख केला.
अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांना पाठवलेल्या नोटिशीत दोन विधानांचा उल्लेख केलाय. नोटिशीत म्हटलंय की, विद्या चव्हाण यांनी अमृता फडणवीसांबद्दल 'ही' अवमानकारक विधान वापरली :
 
1) "रश्मी ठाकरेंना राबडी देवींची उपमा दिली, हे बरं झालं. फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली असती तर...
 
2) "निदान रश्मी ठाकरेंची तशी व्हाईट प्रतिमा आहे हे तरी मला या ठिकाणी भाजपवाल्यांना सांगावं वाटतं. मुख्यमंत्र्यांच्या बायकोविषयी तक्रार करताना तुमच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने काय काय गुण उधळले, त्याविषयी जरा ट्वीट केले तर बरे होईल."

या मानहानी नोटिशीबाबत माहिती देताना अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर एक कविता शेयर केली. ती अशी...
"आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान,
ती आहे राष्ट्रवादीची नेता विद्याहीन चव्हाण,
आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल,तिने पसरविलेली सगळी विषारी घाण.
विद्या चव्हाण मानहानी नोटीस वाच आणि सुधार स्वतः ला, मगच मिळेल तुला निर्वाण."
 
विद्या चव्हाणांनी काय स्पष्टीकरण दिलंय?
अमृता फडणवीसांनी सोशल मीडियावरून मानहानीच्या नोटिशीची माहिती दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी ट्वीट केलंय.
विद्या चव्हाण म्हणाल्यात, "ढोंगीपणाचा कळस आहे. कोण बोलतंय पाहा? अमृता फडणवीस, मोहित भारतीय, भाजप, तुम्ही बुल्लीबाई आणि सुल्लीडिल्सबद्दल बोला."
त्यापूर्वी विद्या चव्हाण यांनीप्रतिक्रियाही दिली. त्यात त्या म्हणतात की, "तुम्ही मला विचारलंत रश्मी ठाकरेंविषयी तुमचं मत काय, त्यावरून हे सुरू झालं. मी म्हटलं, रश्मी ठाकरे या गृहिणी आहेत. राबडी देवींशी तुलना केली हे चांगलं आहे. पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला मी काय शिव्या दिल्या, वाईट म्हटलं, काहीच म्हटलं नाही. त्या किती गोड आहेत त्या, किती छान डान्स करतात, हे त्यांच्या व्हीडिओतूनच आपण पाहिलंय. त्यावरूनच बोललीय. त्यामुळे त्यांना एवढ्या मिरच्या झोंबण्याचं काहीच कारण नव्हतं."
"भाजपच्या लोकांनी विद्या चव्हाणला त्रास देण्याचा प्रयत्न केला. कारण मी विलेपार्ल्याला राहते. मंदिर-मशीद प्रकरण झाल्यापासून, मी संघ आणि भाजपवर टीका करते. ती यांना झोंबलीय. माझ्यावर राजकारणात कुठेही शिंतोडा नाहीय. म्हणून त्यांनी शोधून कुटुंबापर्यंत येऊन प्रयत्न केले. मात्र, कोर्टानं फेटाळले आहेत," असं विद्या चव्हाण पुढे म्हणाल्या.