रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 जानेवारी 2022 (16:02 IST)

रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याबाबत चर्चा का होत आहे?

"रश्मी ठाकरे या पडद्यामागून राजकारणाची अनेक सूत्र सांभाळतात. जर उद्धवजींनी आदेश दिला तर त्यांना ही जबाबदारी मिळू शकते. त्यांची काम करण्याची पद्धत अतिशय चांगली आहे. त्या उत्तमपणे काम सांभाळू शकतात. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री झाल्या तर माझ्यासारख्या सर्व शिवसैनिकांना आनंद होईल."
 
शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधले राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी आणि सामनाच्या मुख्य संपादक रश्मी ठाकरे यांच्याबाबत हे विधान केलं. त्यावरून सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाली.
 
या विधानाला महत्व का आलं?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना होणाऱ्या मानेच्या त्रासामुळे 12 नोव्हेंबरला 2021 त्या त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर मुख्यमंत्री हे सार्वजनिक ठिकाणी लोकांसमोर दिसले नाहीत.
 
राज्याचं हिवाळी अधिवेशन हे मुख्यमंत्र्यांना प्रवास करणं शक्य नाही म्हणून मुंबईत घेतलं गेलं. पण अधिवेशन मुंबईत असूनही तब्येत बरी नसल्यामुळे मुख्यमंत्री अधिवेशनाला येऊ शकले नाहीत.
मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाच्या कारणामुळे त्यांना काम करणं जमत नसेल, तर मुख्यमंत्रीपदाचा चार्ज दुसऱ्या कोणाला तरी द्यावा, अशी मागणी भाजप नेत्यांकडून वारंवार करण्यात आली.
त्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरे किंवा रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करावं असं म्हटलं. मात्र "मुख्यमंत्री बरे आहेत. ते घरातून काम करत आहेत. त्यामुळे कोणालाही चार्ज देण्याची गरज नाही," असं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले.
 
कोरोनाच्या वाढत्या रूग्णांमुळे राज्यात पुन्हा काही निर्बंध लावण्याची वेळ आली. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईन बैठकांना उपस्थित असल्याचं दिसलं. त्यामुळे या चर्चांना काही अंशी ब्रेक लागला, असं वाटत असताना शिवसेनेच्याच मंत्र्याने असं वक्तव्य केल्यामुळे त्याला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झालं.
 
मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाच्या पार्श्वभूमीवर असं भाष्य करणं यामागे काही शिवसेनेची रणनीती तर नाही ना? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले.
 
जेष्ठ पत्रकार अभय देशपांडे सांगतात, "मुख्यमंत्र्याच्या तब्येतीच्या कारणामुळे या चर्चा सुरू झाल्या. जेव्हा मुख़्यमंत्री स्वत: लोकांसमोर येतील. प्रत्यक्षात काम करायला सुरू करतील तेव्हा या चर्चा आपोआप बंद होतील. नेत्यांकडून अशी वक्तव्य होत असतात."
 
भाजपच्या हातात कोलित?
अब्दुल सत्तार यांच्या विधानानंतर भाजपच्या हातात कोलीत मिळालं. भाजपच्या आयटी सेलचे महाराष्ट्राचे प्रभारी जितेन गजरिया यांनी रश्मी ठाकरे यांच्याबाबत काही ट्वीट्स केले.
रश्मी ठाकरे यांचा एक फोटो ट्वीट करून त्याला 'मराठीतल्या राबडी देवी' अस कॅप्शन दिलं. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एक फोटो ट्वीट करत त्या कॅप्शन देत म्हटलं, "रश्मी ठाकरे याच सरकार चालवत असतील तर..." आणि पुढे आक्षेपार्ह टीका केली.
 
यावरून जितेन गजरिया यांना सायबर सेलने नोटीस बजावली आणि त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
यावर शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "रश्मी ठाकरे यांचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही. त्या कोणत्याही राजकीय निर्णयात नसतात. भाजप ही भारतीय ट्रोलर पार्टी झाली आहे. त्यामुळे रश्मी ठाकरे यांच्याबाबत चिखलफेक खपवून घेतली जाणार नाही."
 
कोण आहेत रश्मी ठाकरे?
रश्मी ठाकरे या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आहेत. त्याचबरोबर त्या सामनाच्या मुख्य संपादकही आहेत.
 
रश्मी ठाकरे या राजकीय बैठकांना किंवा दौऱ्यांना उद्धव ठाकरे यांच्या अनेकदा सोबत असतात. पण त्यांच्याकडे कोणतंही राजकीय पद नाही. त्यांनी अपवाद वगळता कोणत्याही राजकीय मंचावरून खूप भाषण केलेलं दिसलं नाही. माध्यमांमध्येही त्या कधीच, कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत. कार्यक्रमांना मात्र आवर्जून उपस्थित राहतात.
पण रश्मी ठाकरे या पडद्यामागून राजकारणाची सर्व सूत्र हलवतात ही चर्चा राजकीय वर्तुळात कायम असते. अनेक महत्त्वाच्या राजकीय निर्णयातही रश्मी ठाकरेंचा सहभाग असल्याचं बोललं जातं.
 
2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेना भाजपच्या अंतर्गत वादानंतरही युती झाली. त्यावेळी हे कसं घडलं हा प्रश्न तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता ते म्हणाले होते, "रश्मी वहिनींनी बटाटे वडे आणि साबुदाण्याची खिचडी खायला घातली आणि त्यानंतर काही बोलायची गरजच लागली नाही."
 
या वक्तव्यात अनेक राजकीय अर्थ दडलेले असल्याचं त्यावेळी विश्लेषकांचं म्हणणं होतं.
 
रश्मी ठाकरे मुख्यमंत्री पदाची धुरा घेऊ शकतात का?
रश्मी ठाकरे यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदासाठी जरी चर्चा सुरू असली तरी रश्मी ठाकरे या मुख्यमंत्रिपदाची धुरा आत्ताच्या परिस्थितीत स्वीकारू शकतात का? यामध्ये किती तथ्य आहे? याबाबत बोलताना लोकमतचे सहायक संपादक संदिप प्रधान सांगतात, "यामध्ये काही तथ्य आहे असं मला वाटत नाही."
"रश्मी ठाकरे यांनी याआधीही कोणतीही राजकीय महत्वाकांक्षा असल्याचं त्यांच्या वागण्यातून जाणवू दिलेलं नाही. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या हळदी कुंकू, भोंडला अश्या कार्यक्रमात त्या आवर्जून सहभागी व्हायच्या. पण याव्यतिरिक्त राजकीय मंचावर त्या कधीही महत्वाकांक्षी वाटल्या नाहीत.
 
"जरी असं मानलं की, मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव ते घरातल्या इतर कोणाचा विचार करतील तर आदित्य ठाकरे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारण सक्रीय आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ते सरकारमध्ये मंत्री आहेत. सरकारचं काम कसं चालतं प्रशासनातले बारकावे याबाबत त्यांना आता माहिती झाली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो."
 
"तरीही रश्मी ठाकरेंच्याच नावाचा विचार करायला गेलं तर पुन्हा त्यांना निवडून आणावं लागेल. विधानपरिषदेतून निवडून आणायचं असेल तर पुन्हा राज्यपालांचे दरवाजे ठोठवावे लागतील. जे शिवसेनेसाठी त्रासदायक ठरेल. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी केलेलं वक्तव्य हे पक्षश्रेष्ठींच्या जवळ जाण्यासाठी, त्यांना खूश करण्याच्या भावनेतून केलं असावं असं वाटतं. एका पक्षातून दुसर्‍या पक्षात आल्यानंतर अशी वक्तव्ये नेते करत असतात," असं प्रधान पुढे सांगतात.