दिल्लीत सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक, सत्ता स्थापनेचा निर्णय
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि इतर ज्येष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या सर्व शक्यतांवर यावेळी चर्चा होण्याची अपेक्षा आहे. काल पवार यांनी पुण्यात त्यांच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसह बैठक घेतली.
राज्यातली राष्ट्रपती राजवट समाप्त करुन सरकार स्थापनेच्या गरजेवर यावेळी बैठकीत एकमत झालं. अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील इत्यादींसह पक्षाचे जेष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. आज काँग्रेस नेत्यांच्या दिल्लीतल्या भेटीनंतरच पुढील निर्णय होईल, असं पक्ष प्रवक्ते नवाब मलिक यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. दरम्यान, राज्यातलं सरकार हे निःसंशय शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचंच राहील असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राज्यात अजूनही सत्ता स्थापनेचा तिढा मिटला नाही, तर भाजपा ने देखील त्यांचे प्रयत्न बंद केले नाहीत. राज्याचा कारभार सध्या राज्यपाल पाहत आहेत.