शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 9 नोव्हेंबर 2020 (08:24 IST)

ब्राम्हण महासंघाकडून खडसेंच्या 'त्या' वक्तव्याचा निषेध

एका ब्राह्मणाला मी मुख्यमंत्रीपदाचं दान दिलं, असं जाहीर वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे. ब्राह्मण महासंघ याचा तीव्र निषेध करतो”, असं ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे म्हणाले आहेत.
 
“दान देण्यासाठी मुळात ती वस्तू आपल्या अधिकारात असायला हवी. याचे ज्ञान खडसे यांना नसावे याचे आश्चर्य वाटतं. खडसे यांनी आपले विधान त्वरित मागे घेऊन माफी मागावी, अन्यथा पुण्यात आल्यानंतर त्यांना याचा जाब विचारण्यात येईल”, असा इशारा आनंद दवे यांनी दिला .
 
“खडसेंनी विधान मागे घेऊन माफी मागावी, या मागणीचे आणि निषेधाचे पत्र घेऊन आम्ही सोमवारी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष चेतन तुपे यांच्या कार्यालयात जाणार आहोत. खडसे यांचा निषेध करुन आमची भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची सुचना आम्ही तुपे यांना करणार आहोत. आज  महाराष्ट्रभर सर्वच शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात आम्ही अशी पत्रे देणार आहोत”, असं आनंद दवे यांनी सांगितलं.
 
“खडसे यांनी वक्तव्य मागे घेतले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसला पदवीधर निवडणुकीत त्याचे परिणाम भोगावे लागतील, याची जाणीव त्यांनी ठेवावी”, असादेखील इशारा दवे यांनी दिला.