शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 9 नोव्हेंबर 2020 (08:18 IST)

दिवाळीत शक्यतो फटाके वाजवू नका, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना राज्यातील कोरोनाचा आकडा आता नियंत्रणात आला आहे. मात्र धोका टळलेला नाही. प्रदूषणामुळे कोरोनाचा धोका वाढत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या दिवाळीत शक्यतो फटाके वाजवू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे.
 
उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या काही महिन्यांत आपण गणपती, नवरात्र असे सण साजरे केले. खरंतर हे सण साजरे केले की पार पाडले हा प्रश्नच आहे. अनलॉक होत असल्याने गर्दी वाढत आहे. गर्दी ही जिवंतपणाचं लक्षण आहे. मात्र अद्याप धोका टळलेला नाही. दिल्लीत कोरोनाचा आकडा वाढतो आहे. पाश्चिमात्य देशातही कोरोना वाढत आहे. दिल्लीत प्रदूषणामुळे कोरोना वाढल्याचे सांगण्यात येत आहे. प्रदूषणामुळे श्वसनसंस्थेवर परिणाम होतो. त्यातून कोरोनाचा धोका वाढतो.
 
त्यामुळे दिवाळीत फटाके फोडण्याबाबत काय निर्णय़ घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र मी बंदी वगैरे घालणार नाही. मात्र शक्यतो दिवाळीत फटाके फोडू नका. प्रदूषण करणारे फटाके वाजवू नका. सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका. मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोना नियंत्रणात येतोय. त्यामुळे गेल्या काही दिवसांत जे कमावलंय ते चार दिवसांच्या धुरात वाहून जाऊ देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.