अन्यथा वारकरी संप्रदाय येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकेल
राज्यातील विठुरायाच्या मंदिराची दारे कार्तिकी यात्रेला उघडून कमीतकमी निर्बंध घालून यात्रा होऊ द्यावी, अशी मागणी वारकरी संप्रदायाच्या बैठकीत करण्यात आली. आषाढीप्रमाणे कार्तिकी यात्रेला संचारबंदी लागू न करता मर्यादित वारकऱ्यांना कोरोनाचे नियम पाळून यात्रेला येऊ द्यावे, प्रत्येक मठात 50 भाविकांना उतरण्यास परवानगी द्यावी. कार्तिकी एकादशीला सकाळी बारा वाजेपर्यंत वारकऱ्यांना सोशल डिस्टन्स पाळून प्रदक्षिणा करू द्यावी, अशी विनंती या प्रस्तावात केली जाणार आहे.
विठ्ठल मंदिर गेल्या 9 महिन्यापासून बंद असल्याने कार्तिकी एकादशीला मंदिराची सर्व दारे उघडावीत आणि भाविकांना मंदिराबाहेरून देवाचे दर्शन घेता यावे अशीही मागणी वारकरी संप्रदायाने केली आहे. याबाबत शासनाने आषाढी यंत्रेप्रमाणेच निर्बंध घातल्यास मात्र वारकरी संप्रदाय येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकेल असा इशारा वारकरी संप्रदायाच्या बैठकीत देण्यात आला आहे.