अन् बिबट्या अडकला खुराड्यात
And the leopard got stuck in the mud कळवण तालुक्यातील नवी बेज गावाच्या शिवारात एका शेतामध्ये पहाटेच्या सुमारास कोंबड्यांची शिकार करण्यासाठी गेलेल्या बिबट्याचा बछडा खुराड्यात अडकला. शेतकरी शेतात आला असता त्याच्या ही बाब लक्षात आली. त्याने वनखात्याला माहिती कळविली.
वनाधिकारी, कर्मचार्यानी घटनास्थळी साधनसामुग्रीसह धाव घेतली. भक्ष्याच्या शोधात आलेले बिबटे विहिरींमध्ये कोसळतात तर कधी वाहनांखालीही चिरडले जाऊन त्यांचा मृत्यू होतो. नवी बेज येथे एका शेतातील घराजवळ असलेल्या कोंबड्यांच्या खुराड्याजवळ बिबट्या आला. कोंबड्यांची शिकार करण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि तो रिकाम्या असलेल्या खुराड्यात जाऊन अडकला.
बिबट्याचे डरकाळ्यांचा आवाज ऐकून शेतकर्याचे लक्ष वेधले गेले. त्यांनी त्वरित खुराड्याजवळ धाव घेतली आणि खुराडा हा व्यवस्थित बंद करून घेतला. लाकडी बल्लीच्या सहाय्याने तो पिंजरा उचलून शेतातून बाहेर आणला. कळवण वनपरिक्षेत्राचे पथक पिंजर्यासह घटनास्थळी दाखल झाले.
बिबट्याच्या बछड्याला बेशुद्ध करून पिंजर्यात स्थलांतरीत करण्यात आले व त्याला वनपरिक्षेत्र विभागाच्या वाटिकेत हलविण्यात आले. बिबट्याचा बछडा नर असून त्याची प्रकृती चांगली आहे.