शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 जून 2021 (12:52 IST)

ED चौकशीसाठी पुरेशी तयारी नसल्याचं सांगून अनिल देशमुख यांनी मागितली मुदत

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर छापे टाकल्यानंतर आता EDने त्यांना समन्स पाठवलं आहे. यामध्ये देशमुख यांनी चौकशीसाठी हजर व्हावे, असे आदेश ED ने दिले आहेत. आज (शनिवार, 26 जून) सकाळी 11 वाजता देशमुख यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. मात्र त्यांनी चौकशीसाठी वेळ वाढवून मागितली आहे.
 
देशमुख यांचे स्वीय सचिव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून प्रिव्हेनशन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्टअंतर्गत या सर्वांची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, ईडी आणि सीबीआयला तपासात संपूर्ण सहकार्य करणार, असं राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
 
काल (शुक्रवार, 25 जून) दिवसभर अनिल देशमुख यांच्या घरी ईडीचं धाडसत्र बघायला मिळालं. त्यांच्या मुंबई आणि नागपूरमधील घरांवर EDच्या अधिकाऱ्यांनी आज छापा टाकला. त्यानंतर संध्याकाळी माध्यमांशी बोलताना देशमुख यांनी म्हटलं, ईडीच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य केलंय, पुढील काळातही करेन.
 
परमबीर सिंह यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, "परमबीर सिंग यांना त्यांच्या पदावरून हटवल्यानंतर त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. मुंबईचे आयुक्त असताना त्यांनी आरोप करायला पाहिजे होते.
 
"पोलीस आयुक्तालयातील सचिन वाझे, सुनिल माने, रियाझुद्दीन काझी यांना अटक केली. हे सर्व अधिकारी परमबीर सिंह यांना रिपोर्ट करत होते. हे अधिकारी मुकेश अंबानी स्फोटकं आणि मनसुख हिरेन प्रकरण प्रकरणात सहभागी आहेत. NIA याचा तपास करतेय. हे अधिकारी आता तुरूंगात आहेत." "या प्रकरणाची सीबीआय आता चौकशी करत आहे, ईडीसुद्धा चौकशी करत आहे. मी त्यांना सहकार्य करणार आहे," असंही देशमुख म्हणाले.
 
देशमुखांनी मागितली चौकशीची वेळ
अनिल देशमुख यांना ED ने समन्स पाठवून कार्यालयात चौकशीसाठी हजर होण्याचे आदेश दिले आहेत. पण अनिल देशमुख यांनी आजच ED कडे जाण्यात अनिच्छा दर्शवली. त्यांनी हजर होण्यासाठी ईडीकडे वेळ मागितली आहे.
 
अनिल देशमुख यांनी सकाळी ईडीचं समन्स प्राप्त झाल्यानंतर आपल्या वकिलांमार्फत त्यांना पत्र पाठवलं.
 
ईडीने आरोपांविषय कोणतीच कागदपत्रे पाठवली नाहीत. त्यामुळे ईडीच्या चौकशीसाठी पुरेशी तयारी नाही, अशा आशयाचं पत्र पाठवून चौकशीला येण्यासाठी वेळ मागितली, अशी माहिती अनिल देशमुख यांचे वकील जयवंत पाटील यांनी दिली.
 
देशमुखांच्या पत्रावर ED काय उत्तर दिलं, त्यांनी देशमुखांना किती वेळ वाढवून दिली याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. येत्या काही वेळात यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली आहे.