सोमवार, 11 डिसेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 29 मे 2021 (18:23 IST)

अनिल परब : 'माझ्यावरील आरोप सूडबुद्धीने आणि राजकीय हेतूने प्रेरित'

परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात नाशिकमधील निलंबित परिवहन अधिकाऱ्यानं घोटाळ्याचा आणि वसुलीचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. अनिल परब यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत.
 
निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी या तक्रारीत म्हटलंय, "आरटीओ खात्यात पदोन्नतीसाठी आणि इतर व्यवहारात भ्रष्टाचार होतो. अधिकाऱ्यांच्या मदतीने 300 कोटी रुपयांचा ट्रान्सफर पोस्टिंग घोटाळा करण्यात आला आहे."
 
अनिल परब यांनी या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे.
 
त्यांनी ट्वीट करत म्हटलं, "निलंबित मोटार वाहन निरीक्षक निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी माझ्याविरुद्ध तसेच परिवहन आयुक्त व इतर 5 अधिकाऱ्यांविरोधात पंचवटी पोलीस स्टेशन, नाशिक येथे दिलेली तक्रार ही पूर्णतः निराधार व खोटी आहे.
 
"विभागातील अनेक तक्रारींच्या पार्श्वभूमीवर निलंबित झालेल्या अधिकाऱ्याने सूडबुद्धीने खोटे आरोप करून माझी व महाविकास आघाडी सरकारची बदनामी करण्याचे षडयंत्र आखले आहे."
परब पुढे म्हणाले, "मंत्र्यांवर आरोप करून राज्य सरकार या मंत्र्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही, असे भासवून उच्च न्यायालयामार्फत CBI चौकशीची मागणी करणे आणि सरकार व मंत्र्यांची प्रतिमा मालिन करणे, या राजकीय हेतूने केलेली ही तक्रार आहे.
 
"या तक्रारीची नाशिक पोलीस चौकशी करीत असून, चौकशीअंती सत्य जनतेसमोर नक्कीच येईल."
 
दरम्यान, या तक्रारीची दखल घेत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी अनिल परब यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
 
संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत म्हटलं, "100 कोटी महावसूली आता 300 कोटींवर? परिवहन मंत्री परब यांच्या विभागाचे अधिकारी पाटील यांची नाशिक पंचवटी पोलीस स्टेशनात तक्रार, गृहमंत्री वळसे पाटील किमान निष्पक्ष चौकशी करणार का?"