मुंबईत प्राण्यांचे सर्वात मोठे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल
देशातील प्राण्यांचे सर्वात मोठे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय लवकरच मुंबईत महालक्ष्मी येथे उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयात प्रसूती, सर्जरी, औषधी विभागासोबतच एकाचवेळी 300 प्राण्यांना उपचारासाठी दाखल करता येईल, अशी व्यवस्था असणार आहे. शिवाय इथे वेगवेगळे असे एकूण 25 विभाग असणार आहेत. महालक्ष्मी येथे सुरू होणार्या या रुग्णालयासाठी शुक्रवारी महापालिका आणि टाटा ट्रस्ट यांच्यात एक करार झाला आहे.
इथे एकाच छताखाली प्राण्यांच्या विविध आजारांवर उपचार करणे शक्य होणार आहेत. या रुग्णालयात प्राण्यांच्या विविध आजाराचे शोध घेण्यासाठी एमआरआय सुविधाही उपलब्ध करण्यात येणार आहेत. अनेकदा दुर्घटनेवेळी प्राण्यांचा एमआयआर करणे आवश्यक असते, खासकरून कुत्रा या प्राण्याचा अपघात झाला असेल, तर एमआरआय अत्यंत आवश्यक असतो. सध्या तरी मुंबईत अशी व्यवस्था कुठेच उपलब्ध नाही. त्यामुळे गंभीर प्रसंगी प्राण्यांवर उपचार करणे मोठे आव्हान असते. इथे प्राण्यांवर उपचार करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत. पाळीव प्राण्यांचे सीटी स्कॅन, सोनोग्राफी, एमआरआय सहित अन्य दुसर्या प्रकारच्या तपासणीसाठीची सोय होणार आहे.