1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019 (12:24 IST)

ज्यांनी अण्णांना नावे ठेवली असे लोक आज त्यांच्या पाठीशी

ज्यांनी आधीच्या काळात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना नावे ठेवली असे लोक आज आपण अण्णांच्या पाठीशी असल्याचे सांगत आहेत असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. या लोकांना अण्णांच्या उपोषणात रस नाही तसेच यांना अण्णांच्या तब्येतीची काळजी नाही असेही मुख्यमंत्री बोलले आहेत. यावेळी त्यांनी अण्णांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. अण्णांच्या उपोषणाचे राजकारण केले जात असून राजकारण करणे योग्य नसल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी  सांगितले. मुख्यमंत्री सातार्‍यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
 
'आम्ही अण्णा हजारेंना उपोषण करू नये यासाठी विनंती केली आहे. त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या जवळजवळ सर्व मान्य केल्या आहेत. लोकायुक्ताच्या संदर्भात जी संयुक्त समिती बनवण्याची मागणी केली होती त्यासाठी आम्ही होकार दिला आहे. केंद्र सरकारचे जे विषय आहेत त्यासंदर्भातही पत्र दिले आहे.
 
दरम्यान, अण्णा हजारे यांनी राज्य सरकार साफ खोटे बोलत आहे, माझ्या नव्वद टक्के मागण्या मान्य झाल्या असत्या तर मी कशाला उपोषणाला बसलो असतो? असा प्रश्न उपस्थित केला आहे. कोणत्याही मागण्या मान्य झालेल्या नाहीत. या सरकारवर माझा विश्वास राहिलेला नाही. केंद्रातले मंत्री आणि मुख्यमंत्री मला भेटायला येणार असे मला कळवण्यात आले. मी त्यांना कळवले की तुम्ही येऊ नका. कारण तुम्ही आलात की लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. तुम्ही ठोस निर्णय घ्या, मागण्या किती मान्य केल्या ते लेखी द्या, त्यानंतर आम्ही विचार करू. तुमच्यावर आता आचा विश्वास नाही असेही अण्णांनी म्हटले आहे.