गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 22 एप्रिल 2023 (21:19 IST)

अंनिस आक्रमक , सर्व गावकऱ्यांना एकाच पंक्तीत बसून जेवण करू द्या

Trimbakeshwar Mandir
नाशिक :नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील एका कार्यक्रमावरुन अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक झाली आहे. विशेष म्हणजे अंनिस कडून घेण्यात आलेला आक्षेप गंभीर असून उद्या होणाऱ्या कार्यक्रमाच्या संदर्भात इशारा देण्यात आला आहे. अंनिस त्र्यंबकेश्वर येथील तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथील गावजेवणात एक पंगत विशिष्ट जातीचे लोक व त्यांच्या कुटुंबियांची होते. तर इतर बहुजनांसाठी वेगळी पंगत होते. ही पद्धत माणसामाणसात भेदभाव करणारी असून, सामाजिक विषमतेला खतपाणी घालणारी आहे. ही पद्धत बंद व्हावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. अशा आशयाचे निवेदन त्यांनी त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना दिले आहे. रविवारी महादेवी ट्रस्ट कडून गावजेवणाचा कार्यक्रम होणार आहे.
 
निवेदनात पुढे म्हटले आहे की, अनेक वर्षांच्या परंपरेनुसार त्र्यंबकेश्वर येथील महादेवी ट्रस्टतर्फे दरवर्षी प्रयोजन म्हणजे गाव जेवण आयोजित केले जाते. दरवर्षी चैत्र किंवा वैशाख महिन्यात ग्रामदेवतांची काही धार्मिक कर्मकांडे केल्यावर ही जेवणावळ आयोजित केली जाते.
 
त्यासाठी संपूर्ण गावातून लोक वर्गणी तसेच वस्तू रुपात खाद्यसामग्री गोळा केली जाते. गावजेवण असल्याने त्र्यंबकेश्वर गावातील सर्वच सामाजिक स्तरातील जवळपास सर्वच लोक इथे जेवणासाठी येतात. मात्र ह्या गावोत्सवात एका विशिष्ट जातीचे लोक आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी स्वतंत्रपणे अन्न शिजवले जाते. आणि त्यांची जेवणाची पंगत सुद्धा इतर बहुजन समाज घटकांपासून वेगळी बसते. महादेवी ट्रस्ट कडून सार्वजनिक भोजनाच्या ठिकाणी असा संतापजनक आणि मानवतेला कलंक असणारा जातीभेदाचा प्रकार राजरोसपणे येथे वर्षांनुवर्षे घडतो.
 
त्र्यंबकेश्वर येथील काही स्थानिक नागरिकांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ही बाब लक्षात आणून दिली आहे. जर संबंधित महादेवी ट्रस्ट कडून असा जातीभेद आणि पंगतीभेद होत असेल तर ही घटना या देशाच्या राज्यघटनेचे उल्लंघन करणारी असे निवेदनात म्हंटले आहे.
 
याशिवाय बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणून असलेल्या त्र्यंबकेश्वर गावाला श्रद्धेपोटी येणाऱ्या भाविकांच्या श्रद्धेशी केलेली ती गंभीर प्रतारणा आहे, असे महाराष्ट्र अंनिसचे मत आहे.  जर सर्व गावाकडून लोक वर्गणी जमा करून गावजेवण दिले जात असेल तर तेथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांसाठी एकाच वेळी अन्न शिजवले जावे आणि सर्व गावकऱ्यांना एकाच पंक्तीत बसून जेवण करू द्यावे अशी मागणी अंनिसने केली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor