गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 22 एप्रिल 2023 (08:12 IST)

नगर विकास दिनाच्या निमित्त नाशिक महानगरपालिकेला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले

Nashik News :साल २०२२-२३ मध्ये नागरी प्रशासनाच्या विविध कामांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नाशिक महानगरपालिकेला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे. ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्ग महानगरपालिका या गटातून नाशिक महानगरपालिकेस प्रथम क्रमांकाने नगर विकास दिनाच्या निमित्ताने गौरविण्यात आले आहे.
 
मुंबईत नगर विकास दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. विशेषता विक्रमी कर संकलन, राष्ट्रीय शहरी उपजिविका अभियानाची (एनयूएलएम) अव्वल कामगिरी आणि कमी केलेला प्रशासकीय खर्च यामुळे मनपाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
 
आयुक्त आणि कर विभागाच्या उपायुक्त अर्चना तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कर विभागातील कर्मचारी आणि सहा विभागीय अधिकारी यांचे अथक प्रयत्न तसेच प्रभावी वसुली मोहीम राबवल्याने २०२२-२३चे कर वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण झाले आहे. १५० कोटी कर वसुलीचे उद्दीष्ट होते. नाशिक मनपाच्या इतिहासात प्रथमच १२५ टक्के वसुली होऊन १८८ कोटी ७३ लाख रुपये इतका मालमत्ता कर मनपाच्या तिजोरीत जमा झाला आहे.
 
तसेच उपायुक्त करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक मनपाने दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी उपजिविका अभियान (एनयूएलएम) अंतर्गंत सर्व घटकांमध्ये १०० टक्के उद्दीष्ट पूर्ण केले आहे. बचत गट बनविणे, त्यांना शासनाकडून फिरता निधी देणे तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कौशल्य प्रशिक्षण देणे, स्वयंरोजगाराकरीत बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करुन देणे, बेघर व्यक्तींना बेघर निवारा केंद्रा अंतर्गंत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे या सर्व घटकांमध्ये मनपाने उत्कृष्ट काम केले आहे. तसेच प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजने अंतर्गंत महाराष्ट्रात १४० टक्के काम करुन मनपाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
 
तसेच नाशिक मनपाने २०२२-२३ मधील आस्थापना खर्च आटोपशीर ठेवण्यात यश मिळविले आहे. प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांनी मनुष्यबळाचे योग्य नियोजन करुन आणि प्रभावी उपाययोजना राबवुन ३३.०३ टक्के एवढा प्रशासकीय खर्च मर्यादीत ठेवण्यात यश मिळविले आहे. मुंबईतील नगर विकास विभागाच्या या कार्यक्रमाला आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासह मनपा उपायुक्त (एनयूएलएम विभाग) करुणा डहाळे उपस्थित होत्या.
 
Edited By - Ratnadeep ranshoor