शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 जून 2023 (07:28 IST)

आणखी एक मोठी कंपनी गुजरातला; राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांचा राज्य सरकारवर निशाणा

rohit panwar
ज्या राज्यात निवडणूक त्या राज्यात गुंतवणूक अशी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाची रणनीती आहे. हा फंडा इतर राज्यात यापूर्वी वापरला गेला आहे. आता महाराष्ट्रात निवडणुका असूनही उद्योग मात्र गुजरात राज्यात जात आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. राज्यात धार्मिक तेढ निर्माण करून सत्ता हस्तगत करण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा डाव असल्याची शंकाही पवार यांनी व्यक्त केली
 
देशातील ज्या राज्यात निवडणुका झाल्या त्या राज्यात भाजपने महाराष्ट्रात येणारे उद्योग नेले, असा आरोप महाविकास आघाडीच्यावतीने वारंवार केला जातो. आता महाराष्ट्रात निवडणुका आहेत. असे असतानाही राज्य सरकार केंद्राकडे गुंतवणुकीसाठी प्रयत्न करताना दिसत नाही. उलट राज्यात येणारी साडेबारा हजार कोटींची आणखी एक कंपनी गुजरातला नेण्यात आली.
 
यावरून रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. याबाबत पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. पवार यांनी गुजरातमध्ये जाणारा प्रकल्प राज्यात आला असता असा विश्वासही यावेळी व्यक्त केला आहे.
 
ते म्हणाले, “निवडणुका असतात त्या राज्यात गुंतवणूक देण्याकडे केंद्र सरकारचा कल असतो. केंद्राने ही रणनीती यापूर्वी इतर राज्यात वापरली आहे. आता लोकसभेसह महाराष्ट्रातील विधानसभेच्याही निवडणुका आगामी काळात होणार आहेत. त्या निवडणुका विचारात घेता राज्य सरकारने अंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या गुंतवणुकीसाठी प्रयत्न करायला हवे होते. तसा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करायला हवा होता. प्रयत्न केले असते तर कदाचित तळोजामध्ये लुब्रिझोल या कंपनीचा प्लांट आणता आला असता.” राज्यात धार्मिक तेढ निर्माण करून सत्ता हस्तगत करण्याचा राज्य सरकारला विश्वास असावा, असा टोलाही पवार यांनी यावेळी लगावला आहे.
 
रोहित पवार म्हणाले, “राज्यात औरंगजेब, धार्मिक जातीय संघर्ष पेटवून सत्ता हस्तगत करता येते, असा कदाचित सत्ताधारी नेत्यांना विश्वास असावा. राज्य सरकारने आपल्या राज्यात औरंगजेब, धार्मिक तणाव या गोष्टींनी काम भागू शकते, याची खात्री केंद्राला पटवून दिली असावी. त्यामुळेच केंद्राने निवडणुका असूनही महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केले असावे. परिणामी जी कंपनी महाराष्ट्रात येऊ शकली असती ती कंपनी आता गुजरातमध्ये जात आहे.”