गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 जुलै 2021 (16:14 IST)

जळगावात आणखी एकाचा रेबिजने मृत्यू ; महिनाभरापूर्वी कुत्र्याने घेतला होता चावा

जळगाव शहरामध्ये भटक्‍या कुत्र्यांचा उच्छाद वाढला आहे. दरम्यान, जळगावात महिनाभरापूर्वी कुत्र्याने चावा घेतलेल्या आणखी एका व्यक्तीचा रेबिजने मृत्यू झाला आहे. उपचारानंतर त्यांची प्रकृतीही चांगली होती. मात्र अचानक तब्येत ढासळून त्यांचा मृत्यू झाला.अनिल जगदीश मिश्रा (वय ४५,रा.खंडेरावनगर)असे मृत व्यक्तीचे नाव आहे.दरम्यान बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या पत्नीने केला आहे.
 
याबाबत असे की, मिश्रा हे रेल्वेच्या गोदामात हमाली करीत होते. महिनाभरापूर्वी गोदामाच्या परिसरातच त्यांना कुत्र्याने चावा घेतला होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरांनी किरकोळ उपचार करून त्यांना रुग्णालयातून घरी सोडले होते. दरम्यान,बुधवारी (दि.२८) मिश्रा यांना प्रचंड त्रास जाणवू लागला. त्यांच्या तोंडातून लाळ गळत होती. यामुळे पत्नी सविताबाई यांनी त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले.
 
तपासणी करून त्यांना वॉर्ड क्रमांक नऊ मध्ये दाखल करण्यात आले. दुपारपासून दाखल केलेल्या मिश्रा यांच्यावर रात्री उशिरापर्यंत डॉक्टरांनी काहीच उपचार केले नाहीत.वॉर्डातील नर्स, मदतनीस यांनी देखील कोणत्याही प्रकारचे सहकार्य न करता मिश्रा यांना एका कोपऱ्यातील बेडवर ठेवले. पतीवर उपचार करण्यासाठी पत्नी सविता या सतत विनंती करत होत्या मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर गुरुवारी सकाळी मिश्रा यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर वेळीच उपचार केले असते तर कदाचित मिश्रा यांचे प्राण वाचले असते. मात्र, वेळेत उपचार न मिळाल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला असा आरोप सविता मिश्रा यांनी केला आहे. मृत मिश्रा यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.
 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रेबिजने महिनाभरात दुसरा मृत्यू झाला आहे. ३ जुलै रोजी ममुराबाद येथील दहा वर्षीय भरत पालसिंग बारेला याचा रेबिज होऊन मृत्यू झाला होता तर आता अनिल मिश्रा यांचा मृत्यू झाला आहे.