गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (21:32 IST)

कृषी व संलग्न महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरु करण्यास मान्यता – कृषीमंत्री

राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित शासकीय व खाजगी विनाअनुदानित विद्यालये व महाविद्यालयातील नियमित वर्ग दि.२० ऑक्टोबर, २०२१ पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील इयत्ता १२ वी पर्यंतचे वर्ग दि. ४ ऑक्टोबर, २०२१ पासून सुरु करण्यात आलेले आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थी हे १८ वर्षावरील असून बहुतेक विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. याचबरोबर राज्यातील कोविड-१९ बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झालेली असून सद्यस्थितीत ही साथ नियंत्रणात आल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दि. १३ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या परिपत्रकान्वये सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यीत विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयामधील नियमित वर्ग दिनांक २० ऑक्टोबर, २०२१ पासून सुरु करण्यास मान्यता दिली आहे. यास अनुसरुन कृषी विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न विद्यालये आणि महाविद्यालये सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
 
अर्थात विद्यालये अथवा महाविद्यालय, विद्यापीठात येताना सर्व १८ वर्षावरील विद्यार्थ्यांनी लसीचे दोन डोस घेतलेले असावेत. ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहता येणार नाही, त्यांचेसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून द्यावी. ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेने वर्ग सुरु करण्याविषयी स्थानिक प्रशासनाशी विचारविनिमय करून कृषी विद्यापीठांनी निर्णय घ्यावा, त्यानुसार महाविद्यालयांना सविस्तर मार्गदर्शक सूचना / मानक कार्यप्रणाली (एसओपी) द्यावी, वसतीगृहे टप्याटण्याने सुरु करावेत, ज्या विद्यार्थ्यांनी कोविड-१९ ची लस घेतलेली नाही, त्यांच्याकरिता स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवावी. तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचे देखील लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे, अशा सूचना कृषीमंत्री श्री. भुसे यांनी दिल्या.
 
कोविड १९ च्या व्यवस्थापनाबाबतचे राष्ट्रीय निर्देश, कामांच्या ठिकाणाबाबतचे अतिरिक्त निर्देश, राज्य शासनाने वेळोवेळी काढलेली मार्गदर्शक तत्वे किंवा मानक कार्यप्रणाली सर्व कृषी विद्यापीठ, विद्यालये व महाविद्यालयांना लागू असल्यामुळे कृषी विद्यापीठ, महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांनी कोरोना संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने सर्व शासकीय सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही कृषीमंत्री श्री. भुसे यांनी केले आहे.