गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 19 फेब्रुवारी 2024 (12:05 IST)

अशोक चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत हाती घेतले कमळ

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यात काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. आधी मिलिंद देवरा, नंतर बाबा सिद्दीकी आणि आता काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आज अशोक चव्हाण आणि काँगेसचे नेते आणि माजी आमदार अमर राजूरकर यांनी देखील भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे.
 
यावेळी भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे.  मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
 
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांचं पक्षात स्वागत केलं. अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. चव्हाणांच्या प्राथमिक सदस्य पत्रावर बावनकुळे यांनी सही करत भाजपमध्ये प्रवेश दिला आहे.
 
दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणले की, आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. राज्यातील एक मोठे नेतृत्व आज आमच्यासोबत आलं आहे. अनेक वर्षे महाराष्ट्राची विधानसभा, देशाची लोकसभा गाजवली. अनेक मंत्रीपद भूषवले आणि दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची कारकीर्द आपल्याला पाहता आली. ते ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये येत आहेत. मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो, असं फडणवीस म्हणाले.

Edited by -Ratnadeep Ranshoor