रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 जुलै 2021 (12:30 IST)

विधानसभा अधिवेशन दिवस दुसरा :तालिका अध्यक्षांच्या कारवाईनंतर भाजपची अभिरूप विधानसभा आता प्रेस रूममध्ये सुरू

12 आमदारांच्या निषेधार्थ भाजपनं विधान भवनाच्या पायऱ्यांवरच अभिरूप विधानसभा भरवली. पण विधानसभेत यावर आक्षेप घेण्यात आल्यानंतर या अभिरूप विधानसभेवर कारवाई करण्यात आली.त्यानंतर प्रेस रूममध्ये भाजपने त्यांची अभिरूप विधानसभा भरवली.
 
तर विधानसभेत नाना पटोले यांनी फोन टॅपिंग प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला होता. फोन टॅपिंग नेमकं कोणाच्या इशाऱ्यावरून होतं, हे स्पष्ट करावं अशी मागणीही पटोले यांनी यावेळी केली.
 
त्यावर 2016-17 दरम्यान झालेल्या फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून त्यातील दोषींवर कारवाई करण्यात येईल,अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात दिली.
 

भाजपची अभिरूप विधानसभा
"आमचं अधिवेशन शांततेत सुरू होतं पण त्याठिकाणी मार्शल पाठवण्यात आले. पत्रकारांचे कॅमेरे बंद करण्यात आले. आम्ही प्रेस रूममध्ये आम्ही अधिवेशन चालवू. आम्ही पुन्हा विधानसभा सुरू करत आहोत. मीडियाचे कॅमेरे खेचण्याचा प्रयत्न झाले. महाराष्ट्राच्या विधीमंडळात सत्ताधाऱ्यांनी काळा अध्याय लिहीला आहे,ही महाराष्ट्रातली आणीबाणी आहे,"असं देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईनंतर म्हटलं.
 
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे.पण विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभागृहातल्या कामकाजावर बहिष्कार घालत पायऱ्यांवर बसत अभिरूप विधासभा भरवली आहे.
 
सोमवारी विरोधीपक्षाच्या आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं, त्याचा निषेध करण्यात येतोय.
 
सभागृहात जे घडलंच नाही, अशा काहीतरी धादांतपणे खोट्या गोष्टीसांगून आमदारांना निलंबित केलं जात आहे. त्यामुळं विधानसभेत सरकारच्या निषेधाचा प्रस्ताव ठेवत असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधानसभेच्या पायऱ्यांवर भाषण करताना म्हणाले तर विरोधकांशिवाय सभागृहाचं कामकाज सुरू झालेलं आहे.
 
भास्कर जाधवांना सुरक्षा?
तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना संरक्षण पुरवण्याची मागणी काही सदस्यांनी केली.त्यावर मी काही चुकीचं केलं नाही,त्यामुळं मी कधीही संरक्षण घेतलं नाही,असं भास्कर जाधव म्हणाले.
 
मात्र,कालची घडलेली घटना,सोशल मीडियावर सुरू असलेला प्रकार आणि विरोधक देत असलेलं आव्हान आणि आंदोलनाच्या इशाऱ्यांमुळे माझ्या कुटुंबियांना चिंता आहे.त्यामुळं सरकारला वाटलं तर मला सरकारनं संरक्षण द्यावं असं जाधव म्हणाले.
 
विधीमंडळ परिसरात स्पीकर वापरण्यावर आक्षेप
विरोधकांनी विधीमंडळ परिसरात स्पीकर आणि साऊंड सिस्टीम वापरण्यावर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेत आक्षेप घेतला.
 
विधीमंडळ परिसरात स्पीकर वापरण्याची परवानगी नसताना त्याचा वापर करण्यात आल्याबद्दल कारवाई करावी अशी मागणी सदनात सत्ताधारी आमदारांनी केलीय.
 
अशाप्रकारची परवानगी देण्यात आली नसल्याचं विधानसभा उपाध्यक्षांनी सांगत हे स्पीकर जप्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
 
"अजूनही बाहेर सभागृह सुरू आहे. माईक सुरू आहे. सर्व व्यवस्था दिलेली आहे. जे लोकं ही व्यवस्था करून देतात. हा सभागृहाचा अपमान आहे.ते थांबवलं पाहिजे,तोपर्यंत सभागृहाचं कामकाज थांबवलं पाहिजे"अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
 
तर 'जे लोकं ही व्यवस्था करून देतात त्यांना निलंबित करा,' असं सुनील केदार यांनी म्हटलंय.
 
तर विरोधकांनी कामकाजात सहभागी व्हावं अशी विनंती करताना भास्कर जाधव विधानसभेत बोलताना म्हणाले, "काल तालिका सभापती म्हणून असताना विरोधकांना राग आला असेल, पण मी संसदीय कार्यमंत्र्यांना विनंती करतो,अध्यक्षांच्या मार्फत विरोधकांना कामकाजात सहभागी करण्यासाठी विनंती करावी.कारण आपण कृषी कायद्याच्या संदर्भात ठराव आणतोय तो ठराव मांडत असताना विरोधकही महत्त्वाचे आहेत. कारण त्यांच्याशी चर्चा करूनच आपण पुढे जातो."
 
तर आपल्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी फोन टॅप करण्यात आल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय. "माझाच नाही तर संजय काकडे आणि रावसाहेब दानवे यांच्या पीएचा नंबर टॅप करण्यात आला.तुमचा अनिल देशमुख करून टाकू.तुमचा भुजबळ करून टाकू अश्या धमक्या देतात, माझ्यासाठी अमजद खान असा कोड ठेवण्यात आला होता," असं नाना पटोलेंनी म्हटलंय.
 
तर शेतकर्‍यांच्या प्रश्नावर चर्चा करण्याबाबत आमदार रवी राणा यांनी विधानसभेत अध्यक्षांजवळ बॅनर फडकवले आणि राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर त्यांना सुरक्षारक्षकांनी सदनाबाहेर काढलं.
 

सोमवारी नेमकं काय घडलं होतं?
केंद्र सरकारनं राज्याला मागासवर्गाची माहिती त्वरीत उपलब्ध करून द्यावी, अशी शिफारस करणारा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी विधिमंडळात मांडला.
 
याला विरोध करताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, "हा प्रस्ताव आला तर विरोधीपक्ष त्याला पाठिंबाच देईल. पण यातून काही साध्य होणार नाही. हा राजकीय प्रस्ताव आहे."
 
तर, ओबीसी आरक्षणाचा ठराव हा आरक्षण देण्यासंदर्भात करण्यात यावा. पण हा ठराव जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी करण्यात आला आहे, असा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला.
 
त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून अध्यक्षांच्या दालनात धक्काबुक्की केल्याचा आरोप तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केला.
 
भास्कर जाधव हे तालिका अध्यक्ष म्हणून काम पाहत असताना हा प्रकार घडल्याचं सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी म्हटलं.
 
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे आरोप फेटाळून लावले.
 
त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी भाजपच्या बारा आमदारांना निलंबित करण्यात आलं.
 
संजय कुटे,आशिष शेलार,जयकुमार रावल,गिरीश महाजन,अभिमन्यू पवार,हरिष पिंपळे,राम सातपुते,जयकुमार रावल,पराग अळवणी,नारायणे कुचे,बंटी भांगडीया,योगेश सागर या बारा आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.एका वर्षासाठी त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
 
त्यानंतर या बारा आमदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
 
भाजप आमदारांच्या निलंबनाचं षडयंत्र रचण्यात आलं. राज्यपालांनी घडलेल्या घटनाचा अहवाल मागवावा, अशी मागणी केल्याचं भाजप आमदार आशिष शेलार यांनी सांगितलं. ठाकरे सरकारने लोकशाही मूल्यांची हत्या करून प्रेतयात्रा काढली असंही ते म्हणाले.
 
मंत्रीमहोदयांनी दाखवलेला व्हीडिओ पाहिला तर लक्षात येतं की आमच्यापैकी कोणीही अपशब्दांचा वापर केलेला नाही.आम्ही या कारवाईचा निषेध करतो,असा दावासुद्धा त्यांनी केला.