शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 फेब्रुवारी 2023 (20:46 IST)

धर्मांतराचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; कथित फादरसह चौघांना अटक

नाशिक (प्रतिनिधी): महिलेच्या कौटुंबिक असहाय्यतेचा फायदा घेत तिला धर्मांतराचे आमिष दाखवत महिनाभर एका घरात कोंडून तिच्यावर महिनाभर अत्याचार करण्यात आल्याची घटना सिन्नर येथे घडली आहे.
 
सदर महिलेच्या फिर्यादीवरून सिन्नर पोलीस ठाण्यात कथित फादरसह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
 
अहमदनगर जिल्ह्यातील पस्तीस वर्षीय महिला रोजगारासाठी पतीसमवेत माळेगाव एमआयडीसी परिसरात वास्तव्याला होती. मिळेल ते काम करून ते आपला चरितार्थ चालवत होते.
 
दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सदर महिला माळेगाव येथून मुसळगाव औद्योगिक वसाहतीमध्ये रोजगार शोधण्यासाठी जात होती.वावीवेस परिसरातील रिक्षा थांब्यावर तिची दोन महिलांनी विचारपूस केली. आपण रोजगार शोधण्यासाठी मुसळगाव एमआयडीसीत जात असल्याचे सांगताच त्यांनी तू आमच्या सोबत चाल आम्ही तुला काम मिळवून देतो असे सांगितले व गोंदेश्वर मंदिराजवळच्या जोशीवाडी येथील हनुमान मंदिराशेजारील त्यांच्या घरी येऊन गेल्या.
 
घरी गेल्यावर या दोघींनी त्यांची नावे बुट्टी व प्रेरणा अशी सांगितली. यावेळी घरात भाऊसाहेब उर्फ भावड्या दोडके हा देखील होता. त्याने या महिलेस बाई तुझी तब्बेत बरी राहत नाही तर तुला आम्ही सांगतो ते कर, ‘तु येशुची प्रार्थना कर’ तुला बरे वाटेल, तुझी आर्थिक परिस्थिती पण सुधारेल असे सांगून या तिघांनी तिला धर्मांतराचे आमिष दाखवले.
 
त्याच सांयकाळी त्यांनी राहुल फादर या व्यक्तीला बोलाउन घेतले. राहुल फादर याने काहीतरी पुटपुटत लाल रंगाचे पाणी या महिलेस पाजले व एक येशुचे चित्र असलेले पुस्तक दाखविले. त्यानंतर या महिलेस गुंगी आल्यासारखे वाटल्याने ती तेथेच त्यांच्या घरी झोपली. त्या रात्री भावड्या याने तीच्यावर अत्याचार केला. त्यानंतर बुटटी व प्रेरणा यांनी तिला घरातच डांबुन ठेवले.
 
दि. 02 डिसेंबरला प्रेरणा हिने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व हातातील बांगड्या बळजबरीने काढून घेतल्या व येशुच्या नावाने काळा धागा गळयात बांधला. त्यानंतर रात्री जेवन करुन सदर महिला झोपल्यानंतर तेथे भाउसाहेब दोडके उर्फ भावडया, त्याचे सोबत राहुल फादर तसेच गळ्यात चांदीची चैन घातलेला अंदाजे 40 वर्ष वयाचा एक अनोळखी पुरुष आला.
 
त्यांनी दमदाटी करुन आळीपाळीने या महिलेवर अत्याचार केला. त्याविषयी बुटी, प्रेरणा यांना सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तसेच भावडया व राहुल फादर यांनी महिलेस दमदाटी करून मारहाण केली व सदर प्रकाराबाबत कोणाला काही सांगायचे नाही. सांगीतले तर तुझा खुन करुन तुला पुरून टाकू अशी धमकी दिली. तेव्हापासून सातत्याने तिच्यावर अत्याचार सुरूच होते.

17 डिसेंम्बरला या महिलेचा पती तिला शोधत जोशीवाडी परिसरात आला होता. तेथे त्याने पत्नीला बघितल्यावर घरात आला. त्यावेळी बुटटी, प्रेरणा व भावडया यांनी दमदाटी करुन त्याला हुसकावून लावले व सदर महिलेच्या लहानग्या मुलास बळजबरीने ठेउन घेतले.

त्याला त्या दोघी बळजबरीने पैशांसाठी भिक मागायला गावात पाठवायच्या. न गेल्यास मारहाण करायच्या. तिच्या पतीला मारण्याची धमकी दिल्याने तो घाबरून जोशीवाडीकडे फिरकत नव्हता. मात्र, 29 डिसेंम्बरला एका मित्रासोबत येऊन तो पत्नी व लहान मुलगा यांना घेऊन जाऊ लागला.

तेव्हा बुटटी,प्रेरणा,भावड्या यांनी त्या सर्वांना तुम्ही आत्ताचे आत्ता सिन्नर सोडा, नाहीतर तुम्हाला ठार करु असा दम दिला. त्यामुळे सदर महिला तिचा पती व मुलांसोबत अहमदनगर नगर जिल्ह्यातील त्यांच्या गावी निघून गेली होती.
तेथे गेल्यानंतर दोन दिवसांनी तिने पतीला तिच्यासोबत महिनाभर घडलेल्या प्रकाराबाबत सांगीतले. त्यानंतर हिम्मत एकवटून सिन्नर पोलीस ठाण्यात येऊन सदर महिलेने शनिवारी रात्री पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यासमोर आपबीती कथन केली. तिच्या फिर्यादीवरून बुटटी, प्रेरणा, भाउसाहेब उर्फ भावड्या दोडके, राहुल फादर व एक 40 वर्षीय अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, बुट्टी व प्रेरणा यांनी सिन्नर मधील एका दुकानदार व्यक्तीला घरी बोलावुन या महिलेस त्याच्यासमोर उभे केले व आजपासुन हे तुझे मालक आहेत असे सांगितले. तुला त्यांनी सांगीतलेली सर्व कामे करावी लागतील त्यांचेकडे दिवसरात्र कामावर रहा असे सांगीतले.
 
तेव्हा आपल्याला वेश्या व्यवसायासाठी विकले जात असल्याची जाणीव झाल्याने या महिलेने जोरात कल्ला करुन शिवीगाळ सुरु केल्यावर सदरचा व्यक्ती तेथुन पळुन गेला. धर्मांतराच्या नावाखाली महिलेला बळजबरीने घरात डांबून ठेवून तिच्यावर महिनाभर अत्याचार करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आल्यानंतर सिन्नर पोलिसांनी तातडीने याबाबत वरिष्ठांना माहिती दिली.
 
जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप,अप्पर अधीक्षक माधुरी कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुनराव भोसले यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास सोपवण्यात आला.
 
पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यासह सिन्नर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी या गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या चौघांना रविवारी सकाळी दिवस उजडताच ताब्यात घेतले. भाऊसाहेब उर्फ भावड्या यादव दोडके (३५) रा. जोशीवाडी, कथित फादर राहुल लक्ष्मण आरणे (२९) रा. गौतमनगर, सिन्नर, रेणुका उर्फ बुटी यादव दोडके (४५) रा. जोशीवाडी व प्रेरणा प्रकाश साळवे (२५) राहणार द्वारका, नाशिक अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
या गुन्ह्यातील एक संशयित मात्र फरार आहे. अटक केलेल्या सर्वांना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor