सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020 (09:45 IST)

सप्तशृंगी गडावरचा शारदीय नवरात्रोत्सव रद्द

साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ असलेल्या सप्तशृंगी गडावरील आदिमाया सप्तशृंगीचा येत्या १७ ऑक्टोबरपासून सुरु होणारा शारदीय नवरात्रोत्सव आणि त्यानिमित्ताने भरणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर यात्रा कमिटीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सप्तशृंगीगडावर प्रशासनाच्या सर्व विभाग प्रमुखांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 
 
दरवर्षी नवरात्रोत्सवात सुमारे चार ते पाच लाख भाविक पदयात्रेने तसेच कावड यात्रेसाठीही एक ते दीड लाख कावडीधारक राज्यासह, मध्यप्रदेश, गुजरात राज्यातून विविध ठिकाणाहून वेगवेगळ्या नद्यांचे पवित्र जल कावडीद्वारे शेकडो-हजारो किलोमीटरचा अनवानी पदयात्रेने प्रवास करुन येतात.  कोजागिरीच्या दिवशी आदिमायेचा कावडीने आणलेल्या जलाचा महाअभिषेक घालतात. दोन लाखांवर पदयात्रेकरु कावडीधारकांसोबतच कोजागिरी पौर्णिमा, कावडयात्रेसाठी सहभागी होत असतात. तसेच कोजागिरी पौर्णिमेस तृतीयपंथीयांची छबिना उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या दिवशी राज्यासह देशभरातून तृतीयपंथीयांचे गुरुंसह तीन ते चार हजार तृतीयपंथी गडावर येवून छबिना मिरवणूक काढतात. या  नवरात्र व कोजिगीरी पौर्णिमा उत्साहात पंधरा ते वीस लाखांवर भाविक दरवर्षी गडावर हजेरी लावून आदिमायेचरणी नतमस्तक होतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव व कावडयात्रोत्सव रद्द केल्याने भाविक व कावडीधारकांची वर्षानूवर्षांची गडावरील पालखी, कावड, पायीवरीची परंपरा खंडीत झाली आहे.
 
दरम्यान नवरात्रोत्सव काळातील नियमित धार्मिक विधी, होमहवन पुजा, कीर्तीध्वज पुजन व ध्वजारोहन, दसरा उत्सव आदी कार्यक्रम कोविड संदर्भातील अत्यावश्यक नियमावली पाळून व नेमूण दिलेल्या पुरोहितांच्या उपस्थित  संपन्न होणार आहे. तसेच पदयात्रोकर व कावडीधारक गडावर येवू नये यासाठी प्रशासनाच्यावतीने तालुकासीमा व गडावरील येणारे रस्ते सील करण्याबाबत प्रशासनास सुचना देण्यात आल्या आहे. तसेच नवरात्रोत्सव व कावड यात्रेसाठी सप्तशृंगी गडावर न येता आपल्या घरीच आदिमायेची घटस्थापना व पुजा विधी करुन दर्शन घेवून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.