रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मराठवाड्यात वंचित बहुजन आघाडीच्या विधनासभा मुलाखती सुरु

लातूर येथे विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या इच्छूक उमेदवारांच्या मुलाखतींना जोरदार प्रतिसाद मिळाला. लातूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघांसाठी ७० जणांनी मुलाखती दिल्या-अर्जही दिले. या सत्तर जणात लातूर शहरमधून १६, अहमदपुरातून १३, लातूर ग्रामीणमधून १२, उदगीरमधून १०, औशातूनही १० तर निलंग्यातून ०९ जणांनी उमेदवारी मागितली. लातूर राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक राजा मनियार यांनी रात्री वंचितमध्ये रितसर प्रवेश केला. यावेळी लातुरच्या विश्रामगृहात मोठी गर्दी झाली होती. 
 
पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य रेखाताई ठाकूर, अशोक सोनवणे आणि अण्णाराव पाटील यांनी मुलाखती घेतल्या. तत्पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी सेक्युलर पार्टी नाही, मागच्या निवडणुकीत या पक्षाने भाजपासाठी काम केले असा आरोप रेखाताई ठाकूर यांनी केला. 
 
आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी उमेदवारीसाठी सामाजिक व राजकीय कार्यात सक्रिय असणाऱ्यांना प्राधान्य देणार आहे. वंचित बहुजन आघाडीला मागच्या लोकसभा निवडणुकीत मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता, विधानसभा निवडणुकीमध्येही ही आघाडी आपली जादू निश्चितच दाखवून देणार आहे. 
 
आघाडीच्या वतीने नुकत्याच विदर्भातील ११ जिल्ह्यांत तब्बल ६५० उमेदवारांनी आघाडीकडून उमेदवारी मिळावी म्हणून मुलाखती दिल्या आहेत. उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातही असाच प्रतिसाद मिळाला असून लातुरातूनही ही संख्या जवळपास साठ एवढी आहे. उमेदवारी देताना आघाडी गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या कोणत्याही व्यक्ती वा कार्यकर्त्याला उमेदवारी देणार नाही. समविचारी पक्षांना सोबत घेऊन आघाडी राज्यात विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे असेही यावेळी सांगण्यात आले.