सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 ऑक्टोबर 2021 (17:55 IST)

बाळासाहेबांनी खोटं बोलणाऱ्यांना बाहेर काढलं, उद्धव ठाकरेंचा राणेंवर निशाणा

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राची नजर लागलेली बहुप्रतीक्षित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील भेट अखेर झाली.
 
मात्र, या भेटीत फारशी नजरेला नजर न भिडवता, औपचारिकतेपलिकडे एकमेकांची नावंही न घेता ही भेट झाली. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर नारायण राणे आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर दिसले आणि अपेक्षेप्रमाणे एकमेकांना शाब्दिक चिमटेही काढले.
 
खोटं बोलणारे लोक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आवडत नसत, असं आपल्या भाषणात नारायण राणे यांनी म्हटल्यानंतर, त्यानंतर भाषण करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी म्हटलं, "बाळासाहेबांना खोटं बोलणारे लोक आवडत नसत हे खरंय आणि म्हणूनच खोटं बोलणाऱ्यांना त्यांनी हाकलून दिलं."
 
नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आपल्या भाषणात निशाणा साधल्यानंतर, उद्धव ठाकरे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. विशेष म्हणजे, या दोन्ही नेत्यांनी टीका करताना एकमेकांची नावं घेणं मात्र जाणीवपूर्वक टाळलं.
 
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आपण काय काय केलं, याचा पाढा नारायण राणे यांनी व्यासपीठावरून वाचला. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी राणेंना टोमणा मारला. उद्धव ठाकरे म्हणाले, "निदान सिंधुदुर्ग तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलाय, नाहीतर कुणीतरी म्हणे मीच बांधलाय."
 
नारायण राणे, लघू का असेना, सूक्ष्म का असेना, तुम्ही केंद्रात मंत्री आहात, महाराष्ट्राला त्याचा उपयोग होईल अशी आशा आहे, असा टोमणाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
 
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि इतर नेतेही उपस्थित होते.
 
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
कुणी काय केलं, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे
पाठांतर करून बोलणं वेगळं आणि आत्मसात करून बोलणं वेगळं, मळमळीने बोलणं वेगळं, त्यावर नंतर कधीतरी बोलेन
अनेकदा केंद्रीय मंत्र्यांशी बोलावं लागतं, अनेकदा ते कोरडं असतं, पण ज्योतिरादित्य यांच्याशी बोलणं चांगलं होतं
ज्योतिरादित्य आणि माझी नाळ या मातीशी जोडली गेलीय, त्यात राजकारण येणार नाही
निदान सिंधुदुर्ग तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलाय, नाहीतर कुणीतरी म्हणे मीच बांधलाय
इतरत्र जे मिळत नाही, ते माझ्या कोकणात आहे
कोकणाच्या विकासानं आजपासून भरारी घेतलीय, त्याची खरी सुरुवात आजपासून झालीय
विनायक राऊत निवडून आलेले खासदार आहे, मला त्यांचा अभिमान आहे
बाळासाहेबांना खोटं बोलणारी आवडत नव्हती, आणि जे खोटं बोलणाऱ्यांना त्यांनी बाहेर काढलं
नारायण राणे, लघू का असेना, सूक्ष्म का असेना, तुम्ही केंद्रात मंत्री आहात, महाराष्ट्राला त्याचा उपयोग होईल अशी आशा आहे
नारायण राणे तुम्ही कॉलेजसाठी फोन केला, दुसऱ्या क्षणाला सही केली
थोडं नाईलाजानं मला बोलावं लागलं, नाहीतर आजचा हा कार्यक्रम माझ्या कोकण आणि राज्यासाठी महत्त्वाचा कार्यक्रम आहे
विकासाच्या कामात राजकीय जोडे नकोत, बोलायचं नव्हतं, पण नाईलाजास्तव बोलावं लागलं