रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जुलै 2022 (09:55 IST)

मंत्रालयात पाण्याच्या बाटल्यांवर बंदी

mantralaya
राज्याचा प्रशासकीय कामांचा गाडा ज्या मंत्रालयाच्या इमारतीतून हाकला जातो तिथे नागरिकांना प्रवेश करताना पिण्याच्या पाण्याची बाटली घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. काम झाले नाही, वा न होणारे काम प्रशासनाने करावे या हट्टापोटी अनेक जण पाण्याच्या बाटल्यांमधून कीटकनाशक वा रॉकेल घेऊन येतात व ते प्राशन करण्याचा वा अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न करतात.
 
त्यामुळे अशा आत्महत्यांच्या प्रयत्नांना रोखण्यासाठी गृह विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे मंत्रालयातील प्रवेशद्वाराजवळ सध्या पिण्याच्या पाण्याचा बाटल्यांचा खच पडल्याचे दिसून येत आहे. 
 
काही दिवसांपूर्वी मंत्रालयात येऊन विषप्राशन करण्याचा प्रयत्न झाला होता. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून गृह विभागाने पाण्याच्या बाटल्यांवर बंदी घातली आहे. मंत्रालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये याविरोधात तीव्र नाराजी उमटत आहे.
 
मंत्रालयात सर्व सामान्य नागरिकांना आकाशवाणी समोरच्या प्रवेशद्वाराजवळूनच प्रवेश देण्यात येत आहे. हा प्रवेश देताना पोलिसांकडून सर्वांची कसून तपासणी करण्यात येत आहे. संबंधित नागरिकांकडे आवश्यक ते ओळखपत्र आणि गेट पास असल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. त्याचवेळी पोलिसांकडून सध्या पिण्याच्या पाण्याची बाटली घेऊन जाण्यास मनाई केली जात आहे.