नितेश राणेंच्या बालेकिल्ल्यात त्यांच्याच निषेधाचा बॅनर
आमदार नितेश राणेंच्या बालेकिल्ल्यात त्यांच्याच निषेधाचा बॅनर लागला आहे. गावात त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रवेशबंदी करत असल्याच्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.देवगड तालुक्यात कमळ चषक स्पर्धेदरम्यान आमदार नितेश राणे यांनी आनंदवाडी गावाची बदनामी केल्याचं या बॅनरमध्ये म्हटलंय. आनंदवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अज्ञाताने हा बॅनर लावला आहे. देवगड हा नितेश राणेंचा बालेकिल्ला समजला जात असून याच बालेकिल्लातील गावात त्यांना प्रवेश बंदी करण्यात आलीय.
दरम्यान, यावर मी कुठेही चुकलेलो नाही ते भाष्य पालक म्हणून केल्याचं आमदार नितेश राणे यांनी म्हटलंय. कमळ चषक वेळी केलेल्या भाषणावर असंख्य गैरसमज निर्माण करण्यात आलेले आहेत. आनंदवाडीची बदनामी केली म्हणून माझ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय गावाने घेतला. हल्ली ज्या चोऱ्या झाल्या त्यात आनंदवाडी आणि कणकवली येथील मुले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी सेना नेते पोलिसांवर दबाव टाकत असल्याची माहिती मला पोलिसांनी दिली. ते नेते त्यांना वाचवतील पण त्याचं भविष्य अंधारात टाकतील म्हणून माझ्या मतदार संघाचा आमदार तथा पालक या नात्याने माझ्या लोकांसाठी मी ते भाष्य केल्याचं राणे यांनी सांगितलं.