शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

गुप्तधनासाठी घेणार होते मुलांचे जीव

बेळगाव- महालय अमावस्येच्या रात्री पाच मुलांचा बळी देऊन गुप्तधन मिळविण्याचे कारस्थान भडकल गल्लीत उघडकीस आले. या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली असून चार जण पळून गेले आहेत. शिरीन जमादार असे अटक केलेल्या महिलेचे नाव असून मसाबी मुल्ला, जावेद मुल्ला, फारूक मुल्ला आणि सोना मुल्ला अशी या काटातील अन्य सहभागींची नावे आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
 
गौस पिरजादे यांच्या घरात मुल्ला कुटुंबीय भाड्याने राहत होते. पिरजादे यांची 14 महिन्यांची बालिका खतिजा सकाळपासून गायब होती. म्हणून तिचा शोध घेण्यात येत होता. दुपारी दीड वाजता खतिजाच्या रडण्या- ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्यावेळी बंद घराचा दरवाजा काढून आजूबाजूचे लोक घरात गेले असता नरबळीचा प्रकार उघडकीस आला. कटातील सहभागींनी बालिकेसह पाच मुलांचा बळी देऊन गुप्तधन मिळविण्याचा कट रचला होता. नरबळी दिल्यास मोठ्या प्रमाणावर गुप्तधन मिळते असे मांत्रिकाने सांगितले होते.
 
बळी देण्यासाठी घरातच आठ फूट खोल आणि आठ फूट रूंद खड्डा खोदला होता. एका घागरीत लिंबू, कुंकू, उदबत्ती, फळे आदि साहित्य ठेवले होते. बळी देताना मुलांना घालण्यासाठी काळे मुखवटेही आणले होते, परंतू खड्डा खोदताना आवाज झाल्यामुळे आणि लहान मुलीच्या ओरडण्याच्या आवाजामुळे शेजारी जमा झाले आणि हा कट फसला.