मास्क नसल्यास बेस्ट, टॅक्सी आणि रिक्षात प्रवेश नाही
मुंबईत आता मास्क नसल्यास बेस्ट, टॅक्सी आणि रिक्षात प्रवेश मिळणार नाही आहे. याबाबतचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिलेत. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व कार्यालये, आस्थापना, मॉल्स, सोसायटी, सभागृह इत्यादी ठिकाणी ‘मास्क नाही, प्रवेश नाही’, ‘नो मास्क, नो एन्ट्री’ अशा आशयाचे फलक लावण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर सर्व बसेस, टॅक्सी, रिक्षा इत्यादींवर देखील याच आशयाचे स्टीकर्स लावण्याचे निर्देश देण्यात आले असून, या आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशही महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
सार्वजनिक ठिकाणी मास्क योग्यप्रकारे परिधान न करणाऱ्यांवर प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी रुपये २०० यानुसार दंडात्मक कारवाईदेखील यापूर्वीच सुरु करण्यात आली आहे. ही कारवाई अधिक व्यापक व अधिक तीव्र करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आज दिले आहेत. यानुसार आता लवकरच महापालिका क्षेत्रातील कार्यालये, आस्थापना, मॉल्स, सोसायटी, सभागृह इत्यादी ठिकाणी निर्देश फलक बसविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ सुरु करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील बसेस, रिक्षा, टॅक्सी इत्यादींवर देखील ‘मास्क नसल्यास प्रवेश मिळणार नाही’, अशा आशयाचा मजकूर असणारे स्टीकर्स लावण्याचे निर्देश दिले आहेत.