गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 ऑक्टोबर 2021 (08:37 IST)

जेष्ठांनी सोशल मीडियावरील फसवणुकी पासून सावध राहा – डॉ.नीलम गोऱ्हे

कौटुंबिक, सामाजिक तसेच सोशल मीडियावरून जेष्ठ नागरिकांची वाढती फसवणुकीचे प्रमाण मोठे असून त्यावर आळा घालण्यासाठी स्वतःला सावध ठेवणे आवश्यक आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता शक्यतो आर्थिक व्यवहार सावधानतेने करावेत असा सल्ला आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिनानिमित्त महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिला.

जेष्ठ नागरिकांवर होणाऱ्या अत्याचारांविषयीच्या लक्षवेधी सुचना महाराष्ट्र विधीमंडळाला दिल्या गेल्या असून प्रत्येक पोलीस स्टेशनला जेष्ठ नागरिक मदत कक्ष असावेत या संदर्भात पोलीस आयुक्तासोबत चर्चा करून त्यासंबंधीचे निर्देश दिलेले आहेत. त्याचबरोबर विविध गटासाठी वेगवेगळी हेल्पलाईन न ठेवता एकच हेल्पलाईन सुरू करण्याची योजना विचाराधीन असून त्यांचा ११२ हेल्पलाईन नंबर असेल असे देखील डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

समाजातील प्रत्येक वयोगटातील नागरिकांना त्यांच्या हक्कांसाठी साथ देण्याच्या भावनेतून ना.डॉ.नीलम गोऱ्हे (उपसभापती विधानपरिषद, महाराष्ट्र राज्य) काम करतात हे लक्षात घेऊन जनसेवा फाऊंडेशन तर्फे अंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन चर्चासत्रात मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना आमंत्रित केले होते.

याप्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बाबा आमटे, सौ. मंदा प्रकाश आमटे, चित्रपट निर्माते व दिग्दर्शक सुभाष घई, सतिश देसाई,जनसेवा फाऊंडेशनचे डॉ. विनोद शाह आणि सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, जेष्ठ नागरिकाच्या प्रश्नांसंदर्भात मुंबई येथे लवकरच एक बैठक आयोजित करून या विषयावर सखोल चर्चा करू व येणाऱ्या मार्च मधील अधिवेशनामध्ये जेष्ठ नागरिकांच्या संदर्भातील प्रस्ताव मांडू असा विश्वास त्यांनी दिला. सोबतच न्यायदंड अधिकाराने जेष्ठ नागरिकांना माहित नसलेल्या अनेक कायद्यांची माहिती देखील यावेळी त्यांनी दिली.