मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (08:30 IST)

भागवत कराड यांची पंकजा मुंडेंच्या मेळाव्याला दांडी !

पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात आज भगवानगडावर मोठा दसरा मेळावा झाला. या मेळाव्याला हजारो लोक उपस्थित होते. या मेळाव्याला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड येणार असल्याचं सांगितलं जात होतं. कराड औरंगाबादहून बीडच्या दिशेने निघाल्याचंही सांगदितलं जात होतं. पण पंकजा मुंडे भाषणाला उभ्या राहिल्या तरी कराड अखेरपर्यंत आले नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असून कराड यांच्या गैरहजेरीचे अनेक राजकीय अर्थही काढले जात आहे.
 
सावरगाव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दसरा मेळावा पार पडला. लॉकडाऊननंतर दोन वर्षानंतर हा मेळावा पार पडत असल्याने या मेळाव्याला हजारो लोकं उपस्थित होते. या मेळाव्याला भागवत कराडही उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात होतं. ते औरंगाबादहून परळीला येणार असल्याचं सांगितलं जात होतं.  ते हेलिकॉप्टरनं पंकजांसोबत सावरगावच्या दसरा मेळाव्याला पोहोचणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. पण अखेरपर्यंत ते आलेच नाहीत. त्यामुळे उपस्थितांमध्ये नाराजी पसरली. त्यामुळे कराड का आले नाहीत? याचीच अधिक चर्चा होती. कराड यांच्या न येण्यामागे पंकजा यांच्यासोबतच्या वादाची किनार असल्याचीही सांगितली जात आहे. मोदी सरकारने केलेल्या नव्या विस्तरात मराठवाड्यातून डॉ. भागवत कराड यांना संधी देण्यात आली आहे. कराड यांना केंद्रात अर्थराज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे पंकजा नाराज होत्या. प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. कराड यांना त्यांनी शुभेच्छाही दिली नव्हती.

त्यानंतर वरळी येथील निवासस्थानी झालेल्या सभेत त्यांनी भाजप नेत्यांवर नाव न घेता टीकाही केली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी कराड यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिली होती. या घटनेनंतर दोन ते तीन वेळा कराड आणि पंकजा मुंडे यांची भेट झाल्याने त्यांच्यात दिलजमाई झाल्याचंही बोललं जात होतं. परंतु, कराड न आल्याने पुन्हा एकदा या दोघांमधील वादाची चर्चा रंगली आहे.
 
या मेळाव्यात पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांचे भाषण झालं. खासदार प्रीतम मुंडे यांनी १५ मिनिटे भाषण केलं. पण या भाषणात त्यांनी एकाही वेळा कराड यांचा उल्लेख केला नाही. पंकजा मुंडे यांनीही भाषणात कराड यांचा उल्लेख केला नाही. शिवाय कराड यांचा स्टेजवरील पोस्टरमध्येही उल्लेख नव्हता.