शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (21:29 IST)

भारत जोडो यात्रेमध्ये शिवसेनाही सहभागी होणार, भाई जगताप यांची माहीती

bhai jagtap
काँग्रेस नेते राहुल गांधी  यांच्या नेतृत्त्वाखाली कन्याकुमारी ते काश्मिर  भारत जोडो यात्रेची सुरुवात झाली आहे. मुंबईत आयोजन करण्यात येणाऱ्या काँग्रेसच्या या भारत जोडो यात्रेमध्ये बहुतांश राजकीय पक्ष सहभागी होणार आहे. आप आणि एमआयएम वगळता इतर जवळपास सर्व राजकीय पक्ष या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहे.
 
मुंबईत आयोजन करण्यात आलेल्या या भारत जोडो यात्रेमध्ये शिवसेनाही सहभागी होणार आहे. शिवसेना पक्षाशी याबाबत चर्चा झाली असून शिवसेनेकडून मनिषा कायंदे या शिवसेनेच्या प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली.
 
दरम्यान भारत जोडो यात्रेला शिवसेनेने सहकार्य केल्यास दसरा मेळाव्याला काँग्रेस मदत करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असून याबाबत प्रश्न विचारला असता अशी काही एक्सचेंज ऑफर नाही. हे आंदोलन हे देशहितासाठी आहे आणि दसरा मेळावा हे शिवसेनचे बलस्थान आहे असे उत्तर भाई जगताप यांनी दिलं.
 
तर राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष, समाजवादी पक्ष, RPI, रिपब्लिकन पक्ष गवई गट, शेकाप पक्ष भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहे. मुंबई महापालिकेच्या 236 वॉर्डमध्ये आणि संपूर्ण भारतात चार महिन्यात भारत जोडो, नफरत छोडो मोहीम सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवणार असल्याचेही काँग्रेसकडून सांगण्यात आले. गांधी जयंतीच्या दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबरला ऑगस्ट क्रांती मैदानातून भारत जोडो यात्रा निघणार असून विविध ठिकाणी फिरून यात्रा मंत्रालयाजवळील गांधी पुतळ्याजवळ संपणार आहे. मुंबईतील ही यात्रा एका दिवसाची असणार आहे. याशिवाय विविध सामाजिक संस्थाही भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत.

Edited by : Ratnadeep Ranshoor