गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 (21:24 IST)

भातखळकर म्हणतात, म्हणून लतादीदींबद्दल ठाकरे सरकारच्या मनात आकस

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी एक व्हिडीओ ट्वीट केलाय. तो व्हिडीओ जयंत पाटलांकडून करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याचा आहे. त्या व्हिडीओला त्यांनी “सावरकर भक्त असल्याने लतादीदींबद्दल ठाकरे सरकारच्या मनात आकस” असल्याचं कॅप्शनमध्ये म्हटलंय. 
 
भाजपा आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, “शिवाय हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे. आपण गेल्या दोन दिवसांपासून पाहतोय की लतादीदींच्या दुखःद निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ जे करायला पाहिजे होतं, तसं त्यांनी केलं नाही. कदाचित त्या सावरकर भक्त होत्या, हिंदुत्ववादी विचारांच्या जवळ होत्या,जेव्हा त्यांनी त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर पुण्यात हॉस्पिटल उभारले, त्या हॉस्पिटलचं उद्घाटन तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यामुळे लता मंगेशकर यांच्या विषयी या सरकारच्या मनात एक सल होती. लतादीदींच्या निधनानंतर प्रथम केंद्र सरकारने दुखवटा जाहीर केला, त्यानंतर राज्य सरकारने  सुट्टी आणि दुखवटा जाहीर केला. असं असतानाही जयंत पाटील यांनी पुरस्कारांचं वितरण केलं. त्यामुळे या प्रकाराबद्दल केवळ जयंत पाटील यांनीच नाही तर राज्य सरकारने देखील भारताची माफी मागायला पाहिजे,” असं ते लोकशाहीशी बोलताना म्हणाले.