शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 मार्च 2023 (08:51 IST)

नागपूर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न

devendra fadnavis
जलजीवन मिशन कार्यक्रमातंर्गत नागपूर जिल्ह्यातील २३५ कोटी खर्चाच्या ३७२ ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
 
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, समीर मेघे, सुनिल केदार, आशिष जयस्वाल, टेकचंद सावरकर, सहपोलिस आयुक्त अश्वथी दोरजे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा उपस्थित होते.
 
उपमुख्यमंत्री म्हणाले,  शेतकऱ्यांना दिवसा विज देण्याकरिता सोलर फिडरची योजना कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘हर घर जल’ योजनेद्वारे गावातील प्रत्येक घरात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. नागपूर जिल्ह्यासाठी मंजूर एकूण १३२२ पाणी पुरवठा योजनांसाठी केंद्रशासनाने आतापर्यंत ५७८ कोटी रूपये उपलब्ध करून दिले आहेत. २०२४ पर्यंत प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोचवून ‘हंडामुक्त’ समाज करण्याचा प्रयत्न ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. नागपूरचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्याला प्रगतीकडे नेण्यासाठी प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.
 
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, आमदारद्वय चंद्रशेखर बावनकुळे व समीर मेघे,  यांनी देखील उपस्थिताना संबोधित केले.
 
मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. नागपूर जिल्ह्यातील ९४ टक्के नळजोडण्या पूर्ण झाल्या आहेत. आज भूमीपूजन करण्यात आलेल्या एकूण ३७२ पाणीपुरवठा योजनांमध्ये पंचायत समिती काटोल ३९, नरखेड १९, रामटेक ४५, पारशिवनी ४०, कळमेश्वर ३३, सावनेर ५५, भिवापूर २१, उमरेड १९, कुही २५, मौदा २७, हिंगणा २९, कामठी २ आणि नागपूर ग्रामीणच्या १८ योजनांचा समावेश आहे. या सर्व योजनांची अंदाजपत्रकीय किंमत एकूण २३५ कोटी ३४ लक्ष असल्याची माहिती सौम्या शर्मा यांनी दिली.
 
तत्पूर्वी दूरदृष्यप्रणालीद्वारे श्री. फडणवीस यांच्या हस्ते नागपूर जिल्ह्यातील पंचायत समितीनिहाय सर्व योजनांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यांनी जलजीवन ॲपचे उद्घाटनही केले.
 
कार्यक्रमाचे संचालन दिनेश मासोदकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उमल चांदेकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व अधिकारी, स्थानिक नागरिक तसेच सर्व पंचायत समितीचे सदस्य दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor