रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 मार्च 2023 (08:18 IST)

नाशिक शहरात गोळीबार, सिनेस्टाईल घडली घटना

नाशिक शहरातील सातपूरमध्ये कार्बन नाका परिसरात रविवारी दुपारच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली. म्हसोबा मंदिराजवळ तरुणावर चार चाकी गाडीतून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार करत जिवघेणा हल्ला केला. यात हल्लेखोर तिघांनी जुन्या वादातून तरुणावर गोळीबार तसेच कोयत्याने वार  केले. यानंतर मारेकऱ्यांनी आपले वाहन घटनास्थळी सोडून एका कामगाराला बंदुकीचा धाक दाखवत त्याच्या दुचाकीने सिनेस्टाईल पळ काढला.
 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सातपूर येथील कार्बन नाका परिसरातून दोन चारचाकी वाहने जात होती. त्यामधील एक वाहन मुंबई तर दुसरे नाशिक पासिंगचे होते. यातील एका वाहनाने दुसऱ्या वाहनाला धडक दिली. यानंतर एका वाहनाने दुसऱ्या वाहनाचा पाठलाग केल्यावर दोन्ही वाहने सातपूर औद्योगिक वसाहतीजवळ आले असता एका वाहनातील युवकाने जीव वाचविण्यासाठी एका कंपनीच्या  कंपाऊंडमध्ये उडी घेतली. त्यावेळी दुसऱ्या गाडीतील युवकाने  खाली उतरत गोळीबार केला असता यामध्ये एक युवक गंभीर जखमी झाला. यानंतर गोळीबार करणाऱ्या युवकांनी रस्त्याने जाणाऱ्या मोटारसायकल स्वारास अडवून त्याची मोटारसायकल घेऊन घटनस्थळावरुन पळ काढला.
 
दरम्यान, यानंतर घटनेची माहिती समजताच शहर गुन्हेशाखा, सातपूर पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पुढील तपास सुरु केला. तर गोळीबारात जखमी झालेल्या युवकावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor