शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 24 एप्रिल 2022 (15:09 IST)

नितीन गडकरीं कडून मोठी घोषणा : लवकरच औरंगाबाद- पुणे एक्स्प्रेस हायवे होणार !

nitin gadkari
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज एक मोठी घोषणा केली. आता औरंगाबाद ते पुणे प्रवास प्रवाशांसाठी सोपा होणार आहे. लवकरच औरंगाबाद ते पुणे एक्स्प्रेस हाय वे होणार अशी घोषणा त्यांनी केली आहे. या साठी त्यांनी औरंगाबादेत 5 हजार 570 कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पांचं लोकार्पण केलं. तसेच त्यांच्या हस्ते औरंगाबाद ते पैठण या 1670 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या 42 किलोमीटर रस्त्याच्या चौपदीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच राष्ट्रीय महामार्ग 752 विभागातील चिखली  ते  तळेगाव दाभाडे या 37 किलोमीटर असलेल्या रस्त्याचं भूमिपूजन करण्यात आलं.
 
ते विविध रस्ते प्रकल्पांच्या उद्घटनासाठी औरंगाबाद येथील जबिंदा लॉन्स येथे आले होते.त्यांच्या हस्ते औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 औरंगाबाद ते तेलवाडी या 3062 कोटीच्या प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आलं. तसेच नगर नाका ते केम्ब्रिज स्कूलच्या 73 कोटींच्या 14 किलोमीटर रस्त्यांचं लोकार्पण करण्यात आलं. या सह त्यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग 752 लेन पेव्हड शोल्डर बीटी रोड या 181 कोटींच्या 29 किलोमीटर रस्त्याचं लोकार्पण करण्यात आले. या वेळी त्यांनी घोषणा केली. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की, आता या नव्या महामार्गामुळे औरंगाबाद ते पुणे प्रवास आता सव्वा तासात पूर्ण करता येऊ शकेल. त्यामुळे प्रवाशांसाठी हा प्रवास सुखकर असेल. या महामार्गावर 140 किलोमीटर वेगाने प्रवास करता येईल. तसेच 2024 पूर्वी मराठवाड्यातील सर्वच रस्ते अमेरिकेच्या स्टॅण्डर्ड सारखे असल्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलं आहे. या कार्यक्रमाला त्यांचा सह अर्थराज्यमंत्री भागवत कराड आणि रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे हे देखील उपस्थित होते.