शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 28 नोव्हेंबर 2022 (20:58 IST)

सकल हिंदू समाजाच्यावतीने विराट मूक मोर्चा

morcha
नाशिकमध्ये लव्ह जिहाद विरोधात सकल हिंदू समाजाच्यावतीने विविध संस्था आणि संघटना  रस्त्यावर उतरल्या. या सर्वांतर्फे शहरातील विविध रस्त्यावरुन हा विराट मूक मोर्चा काढण्यात आला. हा मूक मोर्चा बी. डी. भालेकर मैदानावरून काढण्यात आला. यात मोठ्या संख्येने हिंदू बांधव व भगिनी सामील झाल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
 
सकल हिंदू समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धर्मांतर बंदी कायदा राज्यासह देशभरात लागू करण्यात यावा. श्रद्धा वालकर या हिंदू भगिनीचा मारेकरी आफताब या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी. गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर, संघटनेवर, राजकीय पक्षावर कारवाई करण्यात यावी. दिल्ली सारखी घटना रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घ्यावा. आफताबने दिल्ली येथे श्रद्धा वालकर हिचे ३५ तुकडे करत निर्घृणपणे हत्या केली. या घटनेने युवतींमध्ये दहशत निर्माण झाली आहे. दिल्लीच नव्हे तर राज्यात लव्ह जिहादची समस्या गंभीर रूप धारण करीत आहे. त्यामुळे देशात लव्ह जिहाद विरोधी कायदा तसेच धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा.