बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (22:23 IST)

भगव्या झेंड्याचे रक्षण करण्याची जबाबदारी भाजपने स्वीकारली आहे : फडणवीस

देशाला मार्गदर्शन देणाऱ्या भगव्या झेंड्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आता भाजपावर आली असून भाजपने ही जबाबदारी स्वीकारली आहे. भगव्या झेंड्याचे रक्षण करून समाजाला न्याय देण्यासाठी सतत झगडत राहू असे म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते यांनी शिवसेना आणि आघाडी सरकारवर टीका केली आहे.  नाशिकमध्ये  कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
 
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी हिंदुत्वावरून भाजपवर टीका केल्यानंतर फडणवीस यांनी याच मुद्द्यावरून शिवसेनेला फटकारले आहे. काही जणांनी भगवा झेंड्याच्या नावाखाली वेगळे कामे सुरू केले आहे परंतु, आता या भगव्या झेंड्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आपण स्वीकारली आहे. कारण भगवा हा शिवछत्रपतींचा आहे, शिवछत्रपती महाराज हे महाराष्ट्राचा आदर्श आणि दैवत आहे. त्यांच्या झेंड्याचा अपमान करणाऱ्यांना आता समाजामध्ये कोणतेही स्थान उरलेले नाही, अशा शब्दात फडणवीसांनी शिवसेनेवर टिका केली.
 
राज्यात तीन पक्षांचे असलेले सरकार काय करत आहेत तुम्हाला माहितीच आहे. मुंबई काय दिवे यांनी लावले आहेत, हे आम्ही रोजच बोलतो आहोत. पण हे तिन्ही पक्ष एकमेकांशी मैत्री करतील, वेगळे लढतील ते उद्या काहीही बोलतील यांच्या पाठीमागे न लागता भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. विकासाला मत देण्यातही भाजपशिवाय पर्याय नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.  सरकारी योजना तळागाळात पोहोचविण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे असे सांगितले.
 
नाशिकवर पुन्हा भगवा फडकवा
नाशिकविषयी बोलतांना ते म्हणाले की, कोरोना काळात  राज्य सरकारने  एक नव्या पैशाची मदत केली नाही. शेवटी मी आलो आणि त्यानंतर ऑक्सिजन मिळालं. सरकारच अस्तित्व नाही. राज्य मुंबईच्या बाहेर देखील असत हे याना माहीतच नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत आपल्या सगळ्यांना पूर्ण ताकतीने उतरावं लागेल. हे तिघे काहीही बोलले तरी आपल्याला तिघांच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र यावं लागेल, असे आवाहन फडणवीसांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
 
यावेळी फडणवीसांनी ठाकरे सरकारचा दलाली खाणारे सरकार असा उल्लेख करत टीका केली आहे. काही जणांना राज्य फक्त दलाली खाण्यासाठी पाहिजे असतं, मात्र आम्ही नाशिकचा विकास केला म्हणून शहराची परिस्थिती सुधारली आहे असे स्पष्ट केले